आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा शंकर यादव यांना सोमवारी, १३ मार्च रोजी सोलापूर ते सीएसएमटी मार्गावर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चालवण्याचा बहुमान मिळाला. महाराष्ट्रातील सातारा येथील सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ही पहिली सर्वदृष्टीने अत्याधुनिक एक्स्प्रेस चालवल्यामुळे हा मध्य रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण असून, रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सोलापूरहून सकाळी ६.०५ वाजता निघालेली ‘वंदे’ दुपारी १२.३५ वाजता अचूक पोहोचली. त्यांचा सहकारी सहाय्यक लोको पायलट मनिष यांनी या ‘वंदे’चे सारथ्य केले. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ताब्यात घेण्यापूर्वी रेल्वेच्या नियमांनुसार त्यांनी ‘साईन ऑन’ केले आणि ड्युटी संपल्यानंतर ‘साईन आऊट’ केले. ‘वंदे’ला सुरू करण्यापूर्वी त्यांनी मनोभावे देवाला ‘वंदे’ केले व ‘वंदे भारत’चे काम नेहमीप्रमाणेच सुरू केले.
याआधी कित्येक वर्षांपासून मी सीएसएमटी ते पुणे आणि पुण्याहून मुंबईला येत होती. त्यामुळे मला ट्रेन चालवणे नवीन नाही. मात्र ‘वंदे भारत’मधील एकूणएक, सर्व यंत्रणा अत्याधुनिक असल्यामुळे त्यासाठी चार-पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. ते संपूर्ण झाल्यानंतर, मी लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट मनिषने गाडीचे जाता-येता सारथ्य केले. ‘डिव्हिजन’मध्ये या गाडीचा वेग ताशी १०५ इतका असतो आणि डिव्हिजनबाहेर गेल्यावर ताशी १३० वेगाने गाडी पळते. या गाडीचे सारथ्य करणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे. कारण, ही ट्रेन तांत्रिकदृष्ट्या अॅडव्हान्स आहे, अशी माहिती सुरेखा यादव यांनी दिली.

ही गाडी चालवताना गाडीतील सर्व दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे, तिच्या वेगाचा जरासाही परिणाम जाणवत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्या कळवा, ठाणे येथे गेली १० वर्षे राहत आहेत. त्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या पहिल्या महिला चालक आहेत, अशी माहिती कळताच त्यांच्या सहकारी आणि आप्तेष्टांनी त्यांचे मन:पूर्वक अ•िानंदन केले.
सन १९८८मध्ये त्या भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. त्यांच्या कामगिरीसाठी, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८वर सत्कार करण्यात आला. त्यांना १९९५मध्ये मध्य रेल्वेच्या मालगाडीवर चालक होण्याची, १४ एप्रिल २०००मध्ये मुंबईहून डोंबिवलीपर्यंत पहिली लोकल चालवली. त्या भारतातील पहिल्या मोटरमन झाल्या. २०१०मध्ये त्या घाटचालक झाल्या आणि ८ मार्च २०११ ते ८ मार्च २०१८, या काळात त्यांना ‘दख्खनची राणी’चे सारथ्य करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी ८ मार्च २०२० रोजी पुष्पक एक्स्प्रेसचे आणि १३ मार्च २३ रोजी त्यांना भारतातील पहिली सोलापूर-सीएसएमटी वंदे भारतच्या पहिल्यावहिल्या चालक होण्याचा मान मिळाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही त्यांना पहिली महिला मोटरमन – पायलट मेल म्हणून गौरवण्यात आले आहे.
सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट होण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गाडी नियोजित वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय ठेवणे, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश असतो.

