राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पक्षाला सुप्रिया सुळे यांच्या रूपाने महिला कार्याध्यक्षा प्राप्त झाल्या आहेत. त्याचे सर्वप्रथम अभिनंदन करूया. महाराष्ट्र राज्यात महिला धोरण प्रथम राबवणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या पक्षातील एका महिलेचा हा गौरव केला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भले ही महिला त्यांची मुलगी आहे, तरीही संसदेत महाराष्ट्राची बाजू हिरीरीने मांडते, ही तिची जमेची बाजू आहे. इतकेच नव्हे तर संसदरत्न हा किताबही त्यांनी मिळवलेला आहे. दुसरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राज्याची जबादारी सांभाळणारे अजितदादा पवार यांच्या नेमणुकांकडे मी येणारच आहे. पण प्रथम मान सुप्रियाताईंचा!
ताईंच्या थेट नेमणुकीवरून राजकीय टीकाटिपण्णीही होणारच. ती अगदी वडील आपल्या मुलीलाच झुकते माप देणार येथपासून तो अजितदादांचा ‘गेम’ केला येथपर्यंत. पतंगबाजी काही काळ तर चालणारच. या पतंगबाजीत काही अर्थ नाही. सध्या तर बिलकुल नाही!! सुप्रियाताईंना ही नवीन जबाबदारी नवीन असली तरी गेली काही वर्षे त्या आपल्या बाबांना मदत करतच होत्या. त्या उत्कृष्ट खासदार आहेत यात शंकाच नाही. परंतु खासदाराचे काम आपल्या लोकसभा मतदारसंघातपुरते मर्यादित असते. पवार यांच्या कन्या म्हणून त्या महाराष्ट्राला सुपरिचित असल्यातरी आता कार्याध्यक्षा झाल्यावर त्यांच्या कामाचा अधिक कस लागणार आहे. खासदारकीचे कार्यक्षेत्र आणि संपूर्ण राज्याचा कारभार यांच्यात जमीनअस्मानाचे अंतर आहे.
राज्यातील पक्षाचा गाडा हाकताना अनेक प्रवाहांना सांभाळावे लागते. त्यात काही राजकीय पक्षांशी आघाडी केल्यास त्यांनाही चुचकारावे लागते. राज्याच्या प्रश्नांचा अभ्यास नव्याने करावा लागेल. त्यासाठी सल्लागारांचे जाळे असणे गरजेचे असते. याकामी थोरल्या पवारांच्या बसवलेल्या घडीचा फायदा ताईंना जरूर मिळेल. पण सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून राहता येणार नाही. कारण स्वत:चेही काही योगदान गरजेचे असते. राज्याच्या विविध भागात दौरे करुन राज्य ढवळून काढावे लागेल. प्रत्येक तालुका पातळीवर बारीक नजर ठेवणे गरजेचे असणार आहे. शेतकरी समस्या, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, पिण्याचे पाणी, ग्रामीण भागात अचानक जाणारी वीज असे अनेक ज्वलंत प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. यापैकी काही मोजकेच प्रश्न घेऊन ताईंनी सरकारवर चांगला दबाव टाकला तर त्यांचे काम अधिक सुलभ होणार आहे.

हे कसे पटेल??
दुसरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर पवार यांचे का प्रेम आहे हेच काही कळत नाही. सध्यातरी त्यांचे ‘गुजरात कनेक्शन’ इतकेच कळते. खरेतर पटेल हे काही मासबेस्ड नेते नाहीत. मासच हवा असेल तर आमच्या छगनरावांमध्ये काय कमी आहे? ती महाराष्ट्र सदनाची केस आता जुनी झाली हो… हल्ली त्याची तारीख तरी कधी असते हेच कुणाला कळत नाही. ताईंनी पत्रकारांशी बोलताना सर्व ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन काम करणार असे सांगितले असले तरी ज्येष्ठ नेत्यांना आता वेगळ्या अर्थाने ‘मार्गदर्शक’ खुर्चीवर बसवणार हे जवळजवळ ठरलेलेच असावे. शेवटी नवीन कप्तान आपल्या मर्जीतील नव्या दमाच्या नेत्यांना आणणारच ना? पटेल यांचे हे मात्र बरे आहे की पटेल घराण्यातील दोघे राजकारणीच. मात्र दोघेही आलटून पालटून सत्तारूढ नाही तर विरोधी पक्षात असतातच!!
दादांना मोकळा हात हवाय!
अजितदादा हे राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते असल्याने त्यांना राज्यात लक्ष घालण्यात रस असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनीही आपल्याला राज्यात मोकळा हात मिळावा अशी मागणी पवार यांच्याकडे केल्याचे समजते. अजितदादांनीही आपले लक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्राकडेच आहे हे प्रथम बदलले पाहिजे. सर्व राज्याकडे त्यांनी आपलेपणानेच पाहावे अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. वास्तविक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री होते. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे महत्त्वाच्या अर्थखात्याची जबाबदारी होती. असे असतानाही ‘लोक माझे सांगाती’च्या नवीन आवृत्तीत शरद पवार यांनी दादांबाबत एक चकार शब्दही लिहिलेला नाही. ही खटकणारी बाब आहे. कोरोना काळातील राजेश टोपे यांच्या कार्याची भलामण काका करतात. मात्र पुतण्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करतात, हे कशाचे द्योतक मानावे??
थोरल्या पवारांच्या अशा वागण्यामुळेच दादांबाबतच्या पतंगबाजीस फूसच मिळत असते. या एकाच पुस्तकात असे आहे असे नाही. पवारांवर निघालेल्या सुमारे सात-आठ पुस्तकांमध्ये ते अजितदादांबाबत काहीच बोलत नाहीत व बोललेच तर अगदी जुजबी बोलतात, असे दिसून आले आहे. वास्तविक पुणे जिल्हा तसेच पुणे महापालिका तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात दादांनी बरीच कामे केलेली आहेत. त्याचा साधा उल्लेखही कुठेच नाही. हे काही ठीक लक्षण नाही. एक लक्षात घेतले पाहिजे की, गेल्या दोन-तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची आमदारसंख्या सुमारे ५०च्या आसपास असतेच. महाविकास आघाडीची गणिते जमली तर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र ही सर्व समीकरणे महापालिका निवडणुकांमधील फलितावर अवलंबून आहेत, एव्हढे मात्र खरे…
आगामी विधानसभा निवडणूकीत कोण जिंकून येईल ते आताच सांगता येत नाही. मात्र येणाऱ्या सत्तारूढ पक्षाला राष्ट्रवादीला हलक्यात घेऊन चालणार नाही. जाता जाता शांताराम यांच्या पुढील ओळी चटकन ओठावर आल्या…
“मनात होते सटवीच्या तसे तसे झाले,
कोरलेले दगडावर पुसले नाही गेले,
वाटावे खोटे असे सर्व खरे झाले!
लाजत लाजत सूर्यदेव पश्चिमेला उगवले!!
… खूप खूप उशिरा पांडुरंग भेटले,
कमरेवरचे हात त्यांनी कानावर ठेवले…”

