Homeकल्चर +'मराठी भाषा गौरव...

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ऐका गौरवगीत!

आज रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने ‘स्टोरीटेल’ प्रकाशित करत आहे सुप्रसिध्द लेखक वि. ग. कानिटकरलिखित ‘दर्शन ज्ञानेश्वरी’. ‘मराठिचिया बोलू कौतुके.. अमृताते पैजा जिंके’ अशी मायमराठीची थोरवी सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणानेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा व्हायला हवा.

कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषेचे वैभव वाढवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी डिजीटल युगात काय प्रयत्न करता येतील हे पाहणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यानंतरची दोन दशके संपूर्ण भारतात नवनविन गोष्टी घडत होत्या. साठ आणि सत्तरच्या दशकात मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता असे मानले जाते. या काळात साहित्य, नाट्य, चित्रपट आदी सर्वच कलांमध्ये वेगवेगळे प्रयोग होत होते. विशेषतः नवकथा, कविता, कादंबरी लेखनाला नवे धुमारे फुटत होते. सर्वच स्तरातील लेखक साहित्यनिर्मिती करत होते आणि त्यास मराठी वाचकांचा प्रतिसादही मिळत होता. गावोगावी सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांचे मोठे जाळे निर्माण झाले होते आणि या वाचनालयातून लोकप्रिय तसेच अभिजात साहित्य वाचत नवी पिढी तयार होत होती. अनेक विषयांवरची, मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक प्रकाशित होत होती. नवेनवे प्रकाशक पुढे येत होते. पुस्तके सर्वसामान्यांपर्यंत खेडोपाडी पोहोचवण्यासाठी वाचक चळवळी निर्माण होत होत्या. पुस्तक प्रदर्शने आयोजित केली जात होती. अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या बहरीचा काळ होता.

ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात अर्थकारणाचे महत्त्व वाढले. नव्वद साली भारतीय अर्थव्यवस्था खुली झाल्यावर शिक्षणात कला शाखेपेक्षा वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्राला महत्त्व आलं आणि इंग्रजी भाषेने नव्या पिढीचे विश्व व्यापून गेलं. इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या आणि मराठी माध्यमातील शाळांची दयनीय अवस्था झाली. नव्या पिढीला मराठी वाचता येईना, मराठी भाषा टिकेल की नाही असा सूर येऊ लागला. याच काळात दोन हजार सालानंतर तंत्रज्ञानाचा जोर सर्वच क्षेत्रात वाढला.

संगणकीकरण आणि डिजीटल तंत्रज्ञानाने प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलवर सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध होऊ लागले आणि सर्वच जगात प्रादेशिक भाषांचे महत्त्व पुन्हा वाढू लागले. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर आपले साहित्य फक्त इंग्रजीत प्रकाशित न करता सर्वसामान्यांच्या भाषेत लिहिले पाहिजे हे जाणवू लागले. पुस्तकांप्रमाणेच टि.व्ही., चित्रपट आणि डिजीटल साहित्यनिर्मिती स्थानिक भाषेत होऊ लागली. जगभरातील लोक एकमेकांशी व्यवसाय इंग्रजीतून करू लागली तर स्थानिक व्यवहार, सांस्कृतिक आदानप्रदान आपल्या स्वतःच्या भाषेत करू लागली आहेत. यातून ‘ग्लोकल’ संकल्पना पुढे आली. एकप्रकारे सर्वसामान्य माणसांना जागतिक भान आले. स्थानिक भाषेतून कथा, कविता, नाटके, सिनेमे, कादंबऱ्यांची मागणी वाढत असल्याने डिजीटल जगात ‘रिजनल कंटेट’ किंवा स्थानिक साहित्याला मागणी वाढली.

नव्या तंत्रज्ञानामुळे ‘ओटिटी’ प्लॅटफार्मस वाढले. ‘युट्यूब’, ‘फेसबुक’सारखी व्यासपीठं प्रत्येकाला मोफत व्यक्त व्हायला उपलब्ध झाली. ‘स्टोरीटेल’सारखे ‘ऑडिओ ओटिटी’ प्लॅटफार्मस निर्माण झाले. स्क्रिनचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. यापासून बचावासाठी ध्वनी माध्यमामधून पुस्तके, कथा, कविता, नाटके ऐकण्याचा कल वाढू लागला. ऑडिओमध्ये स्वतंत्र प्रयोग होऊ लागले. खास ऑडिओसाठी लेखन करून त्यानंतर कादंबऱ्यांत रूपांतर करणे सुरू झाले. थोडक्यात, जग ऐकू लागले!

२०१७नंतर स्टोरीटेलने मराठीत पहिल्यांदा ऑडिओबुक्सची संस्कृती आणली. मराठी जनता आपल्या मोबाईलवर नामवंतांचे साहित्य ऐकू लागली. मराठी साहित्य जगभरात कुठेही ऐकता येऊ लागल्याने परदेशातही मोठ्या प्रमाणावर इथले साहित्य ऐकले जाऊ लागले. गेल्या पाच वर्षांत मराठी साहित्यविश्वात एकप्रकारे क्रांतीच झाली. आता कुठेही, कधीही आणि कितीही मराठी ऑडिओबुक्स ऐकण्याची सोय झाली आहे. तुमच्या मोबाईलवर संपूर्ण ग्रंथालय घेऊन हिंडण्याचे सामर्थ्य या उपक्रमामुळे साध्य झालं आहे. कोणतीही भाषा आपण ऐकत ऐकतच शिकतो. त्यानंतर बोलू लागतो आणि मग वाचू आणि लिहू लागतो. मराठी भाषा जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर ऐकत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी आरंभलेला वाड्यज्ञ आणि मागितलेले पसायदान नव्या डिजीटल युगामुळे संपूर्ण विश्वात पोहचत आहे. हीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साजरी करण्याची गोष्ट आहे.

स्टोरीटेलने ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, जगभरातील सर्वांना शुभेच्छा देणारे ‘मराठी भाषा गौरवगीत’ तयार केले आहे. हे गीत आपण स्टोरीटेलच्या युट्युब चैनलवर ऐकू शकता. अभिजात मराठी ऑडिओबुक्स अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन या गीताचे गीतकार प्रसाद मिरासदार यांनी केले आहे. या गीताला दिवंगत संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले असून गायक यश गोखले आहेत.

युट्युब लिंक:- https://www.youtube.com/watch?v=FPM72KslYUc

वि. ग. कानिटकर लिखित “दर्शन-ज्ञानेश्वरी” ऐकण्यासाठील लिंकhttps://www.storytel.com/in/en/books/darshan-dnyaneshwari-1574553

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content