Homeडेली पल्सचांद्रयान-3च्या लँडिंगनिमित्त महाराष्ट्रात...

चांद्रयान-3च्या लँडिंगनिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी विशेष कार्यक्रम

इस्त्रो (ISRO), अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेची तिसरी अभ्यासात्मक चांद्र मोहीम असलेले चांद्रयान-3 आज बुधवार, 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा क्षण अधोरेखित करण्यासाठी अनेक संस्थांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, पुणे, यांनी लॉ कॉलेज रोडवरील एनएफडीसी-एनएफएआय थिएटर येथे आणि एनएफडीसी – नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, मुंबई यांनी पेडर रोडवरील एनएफडीसी–एनएमआयसीमधील जेबी हॉलमध्ये चांद्रयान 3च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून एनएफडीसी – एनएफएआय आणि एनएफडीसी – एनएमआयसी परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या ठिकाणी संध्याकाळी 5:27 वाजता चांद्रयान 3च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सुरू होईल.

चांद्रयान

एनएफएआय इथल्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठातील इस्त्रो विभागाचे संचालक डॉ. अरविंद डी शाळीग्राम, विविध महाविद्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांसह पुण्यामधील शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे शहरातील विद्यार्थी अत्यंत उत्सुक आहेत. मुंबईत, एनएमआयसी इथल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात काम करणारे मुंबईकर उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतले नेहरू सायन्स सेंटरदेखील चंद्रावर 3चे ऐतिहासिक लँडिंग साजरे करण्यासाठी माहितीपूर्ण कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. कार्यक्रमांची सुरुवात दुपारी 2:00 ते 4:00 या वेळेत चांद्रयान 3चे पेपर मॉडेल तयार करण्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या कार्यशाळेने होईल. चांद्रयान 3चे स्वतःचे पेपर मॉडेल तयार करण्यासाठी उत्सुक असलेले 50 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

चांद्रयान

 या सत्रानंतर संध्याकाळी 4:30 ते 7:00 या वेळात केंद्राने संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई इथले माजी शास्त्रज्ञ प्रा. मयंक एन वाहिया, चांद्रयान 3 मोहिमेची सखोल माहिती देतील. हे सत्र उपस्थितांना अद्ययावत ज्ञान आणि मौल्यवान माहितीने समृद्ध करेल. त्याशिवाय, उपस्थितांना केंद्राच्या सभागृहात चांद्रयान 3 मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल. अंदाजे 400 जणांनी केलेल्या नोंदणीवरून या कार्यक्रमाला मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद दिसून येतो.   

रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण, नागपूर येथे सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत डॉ. जी. श्रीनिवासन, वैज्ञानिक-अभियंता, प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर (केंद्रीय) – इस्रो, नागपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यानंतर एसओएस सभागृहात प्रज्ञान रोव्हर मॉडेलचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल आणि 12 ते 12:45 या वेळेत चंद्राच्या विशेष वैशिष्ट्यांवरील एक कार्यक्रम होईल. संध्याकाळी 5 वाजल्यापासून चांद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल.

चांद्रयान

चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्यात चांद्रयान 3 मोहिमेला यश मिळाले, तर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातील चौथा देश असेल, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल. भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून, तो साजरा करायला हवा.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content