Homeब्लॅक अँड व्हाईटदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट...

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला मिळाली नवसंजीवनी!

क्रिकेटच्या पंढरीत लॉर्डस मैदानात झालेल्या आयसीसी कसोटी जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून आरामात पराभव करून जेतेपदावर कब्जा केला. या विजयाबरोबरच द .आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा विजयाचा २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. तब्बल ९७२२ दिवसांनी आयसीसी स्पर्धा पुन्हा एकदा  जिंकण्याl द. आफ्रिकेला यश आले. याअगोदर त्यांनी १९९८ साली आयसीसी चॅम्पियन्स चषक पटकावला होता. पण त्यानंतर गेली २७ वर्षे आयसीसी स्पर्धा विजेतेपद त्यांना हुलकावणी देत होते. या मोठ्या कालावधीत बऱ्याच आयसीसी स्पर्धांत त्यांनी हातातोंडाशी आलेले सामने गमावले. त्यामुळे मोक्याचा क्षणी कच खाणारा संघ असा लौकिक त्यांना मिळाला. त्यामुळे मग द. आफिकेचा संघ क्रिकेटविश्वात चोकर्स नावाने ओळखला जाऊ लागला. त्यामुळेच त्यांचे वन डे आणि टी-२० विश्वचषक विजयाचे स्वप्नदेखील भंग पावले होते. आता अखेर आयसीसी कसोटी विजेतेपद पटकावून तूर्ततरी द. आफिकेने चोकर्सचा शिक्का पुसून काढण्यात यश मिळवले आहे. हे जेतेपद आफिकन संघासाठी लाख मोलाचे आहे असेच म्हणावे लागेल. हा विजय त्यांना नवसंजीवनी देणारा नक्की ठरु शकतो.

या सामन्यातील महत्वाची नाणेफेक द. आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बवुमाने जिंकली. त्याने ऑस्ट्रेलियाला पहिली फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय रबाडा, जेन्सनने सार्थ ठरवला. यांच्या सुरेख माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांतच संपला. माजी कर्णधार स्मिथ ६६ आणि वेबस्टर ७२ धावा यांच्या अर्ध शतकांमुळे ऑस्ट्रेलियाला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. रबाडाने ५ तर जेन्सनने ३ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या काढता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा कप्तान कमिन्सने आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने २८ धावांत ६ बळी घेऊन आफ्रिकेला १३८ धावांत गुंडाळले. कर्णधार म्हणुन कमिन्सची ही सर्वोत्तम कामगिरी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ७४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी  मिळाली. आफ्रिकेच्या फलंदाजांनी खराब फलंदाजी करुन त्यांच्या गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीवर पाणी फेरले. कर्णधार बवुमा ३६, बेडिंघम ४५ धावा या दोघांचा अपवाद वगळता इतर आफ्रिकन फलंदाजांनी नांगी टाकली. त्यांचा सलामीचा फलंदाज मार्कमला भोपळादेखील फोडता आला नाही. त्यामुळे पुन्हा ऑस्ट्रेलियाच विजयी होण्याचे संकेत सामन्यात दिसू लागले. परंतु आफ्रिकेने परत सामन्यात कमबॅक करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पण झटपट २०७  धावांत गुंडाळला.

दुसऱ्या डावातपण त्यांची सुरूवात खराब झाली. मग त्या धक्क्यातून ऑस्ट्रेलियाचा संघ सावरलाच नाही. त्यांचे ७ फलंदाज ७३ धावांत माघारी परतले. करी ४३, स्टार्क ५३ धावा यांच्या चिवट फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने दोनशे धावांचा टप्पा गाठला. पहिल्या डावात ५ बळी घेणाऱ्या रबाडाने दुसऱ्या डावातदेखील तोच जोश‌ कायम ठेवताना ४ बळी टिपले. त्याला निगडीने ३ बळी घेऊन छान साथ दिली. पहिल्या डावात निगडीला एकही बळी मिळाला नव्हता. ती कसर त्याने दुसऱ्या डावात भरुन काढली. ऑस्ट्रेलियाने ३००पेक्षा जास्त धांवांचे आव्हान दिले असते तर

सामना कदाचित पाचव्या दिवसापर्यंत गेला असता. २८२ धावांचे लक्ष्य घेऊन उतरणाऱ्या आफ्रिकेला सलामीवीर मार्करम, कप्तान बवुमाने शानदार खेळी‌ करत तारले. पहिल्या डावात भोपळा न फोडणाऱ्या मार्कमने दुसऱ्या डावात १३६ धावांची झुंजार खेळी करून त्यांच्या विजयाचा पाया रचला. त्याला बवुमाने ६६ धावा करुन चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी  १४७ धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. कप्तान बवुमाच्या पायाला दुसऱ्या डावात दुखापत झाली होती. पण त्यावर मात करुन त्याने संयमी फलंदाजी करुन मार्कमला मोलाची साथ दिली. मुल्डर २७, बेडिंघम नाबाद २१ धावा, यांनीपण चिवट फलंदाजी करुन त्यांच्या विजयास हातभार लावला.

विजयासाठी कुठला धोका पत्करायचा नाही हे आफ्रिकन फलंदाजांनी ठरवलेच होते. विजयासाठी शेवटच्या ६९ धावा त्यांनी २७.४ षटकांत पूर्ण केल्या. कसोटी सामन्यांच्या इतिहासातील हे यशस्वीरित्या पार केलेले पाचव्या क्रमांकाचे लक्ष्य होते. कसोटीत आफ्रिकेचा हा सलग आठवा विजय होता. कप्तान म्हणून बवुमाचा नववा कसोटी विजय होता. त्याने आतापर्यंत दहा कसोटीत नेतृत्त्व केले आहे. एक सामना अनिर्णित राहिला. फंलदाजीत त्याने फारशी चमक दाखवली नाही. ६४ कसोटीत ४ शतकांसह ३७०८ धावा, ४८ वन डे सामन्यात  २८४७ धावा आणि टी-२०मध्ये ३६ सामन्यांत ६७० धावा त्याच्या नावावर आहेत. बवुमाची आफ्रिकेच्या कर्णधारपदी निवड झाली आणि त्याचे अच्छे दिन सुरु झाले. बवुमा कप्तान म्हणून कितपत यशस्वी ठरेल याबाबत तेव्हा शंका व्यक्त केली जात होती. पण त्याने आपल्या टिकाकारांना चोख उत्तर दिले. कसोटीत शतक काढणारा तो पहिला कृष्णवर्णीय फलंदाज आणि कर्णधार ठरला आहे. आयसीसी स्पर्धांत चौदा वेळा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कसोटी जग्गजेतेपद मिळवणारा न्युझीलंड, ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता द. आफ्रिका तिसरा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेला तीनही नवे विजेते मिळाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. त्यामुळेच जेतेपद राखण्यात त्यांना अपयश आले, असेच म्हणावे लागेल. पहिल्या डावात घेतलेल्या ७४ धावांचा आघाडीचा फायदा ऑस्ट्रेलियाला घेता आला नाही. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या उस्मान खाव्जा, माजी कप्तान स्टीव स्मिथ यांची जागा धोक्यात येऊ शकते. ग्रीनला निव्वळ फलंदाज म्हणून घेऊन तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची मोठी चूक ऑस्ट्रेलियाच्या संघव्यवस्थापनाला चांगलीच नडली. ग्रीन दोन्ही डावात अपयशी ठरला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर नेहमीच खेळणाऱ्या लाबुशेनला सलामीत यावे लागले. पण ती चालपण चुकली. भारताविरुद्ध सलामीत कोंटासने चांगली कामगिरी केली होती. त्याला डावलण्याची मोठी चूक ऑस्ट्रेलियाने केली. त्यांचा अनुभवी फिरकी गोलंदाज नाथन लायनने या सामन्यात चांगलीच निराशा केली. दोन्ही डावात त्याला एकही बळी घेता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे त्याने १३७ कसोटीत ५५३ बळी घेतले. ३७ वर्षीय लायनच्या गोलंदाजीवर आता वाढत्या वयाचा परिणाम दिसू लागला आहे. कदाचित तो लवकरच निवृत्तीचा विचार करेल. त्याची जागा घेण्यास मर्फी, कुहनमेन हे युवा गोलंदाज सज्ज आहेत. २०२७मध्ये द. आफ्रिकेत वन डे विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी हा विजय द. आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी नवी दिशा देणारा ठरेल. हीच विजयी दौड द. आफ्रिकेचा संघ कितपत कायम ठेवतो ते बघायचे.

Continue reading

भारतीय हॉकी संघाचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’!

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाने सलग दोन कांस्यपदकं जिंकून भारतीय हॉकीसाठी पुन्हा अच्छे दिन आणले. त्यामुळे सहाजिकच भारतीय हाॅकीला एक नवी झळाळी मिळाली. भारतीय हाॅकीप्रेमींच्या भारतीय हाॅकी संघाकडून पुन्हा मोठ्या अपेक्षा बाळगल्या जाऊ लागल्या. पण नुकत्याच झालेल्या मानाच्या एफ.आय.ई.एच....

जाणून घ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन टेनिस स्पर्धेविषयी…

जून महिना उजाडला की साऱ्या टेनिसविश्वाला वेध लागतात ते लंडनमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे. टेनिस जगतात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या चार ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा मानाच्या, प्रतिष्ठेच्या म्हणून समजल्या जातात. पण या चार स्पर्धांत विम्बल्डन स्पर्धेची...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयसला डावलल्याचीच चर्चा!

आजपासून यजमान इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या तेंडुलकर-अंडरसन चषकासाठीच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या पाहुण्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गज भारतीय खेळाडूंच्या गैरहजेरीत भारत पहिल्यांदा कसोटी...
Skip to content