Homeडेली पल्सकामगार चळवळीचा आत्माच...

कामगार चळवळीचा आत्माच काळाच्या पडद्याआड!

कोरोना महामारीमुळे अडकून पडलो होतो आणि सुमारे वर्षभरानंतर कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरात दौऱ्यावर निघालो. अहमदाबाद येथे पोहोचलो. याचवेळी माझ्या मित्राने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे झुंझार सरचिटणीस अविनाश दौंड यांचा एक संदेश अग्रेषित केला. पाठोपाठ याच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी संपर्क साधत ‘गुरुजी, कर्णिक साहेब गेले’ ही बातमी दिली. ही बातमी ऐकताच गेल्या ५० वर्षांचा कालखंड झर्रकन डोळ्यासमोर आला. रमाकांत गणेश कर्णिक म्हणजेच समस्त कामगारांचे लाडके नेते र. ग. कर्णिक! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्त्वात आला. त्यापूर्वीच राज्य सरकारी कर्मचारी संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १९६२ साली या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. इतकेच नव्हे तर चव्हाण यांनी या आपल्या हक्काच्या कर्मचाऱ्यांना संघटनेसाठी मायेच्या ममतेने कार्यालयसुद्धा उपलब्ध करुन दिले.

र. ग. कर्णिक यांनी हां हां म्हणता आपल्या या संघटनेचा जम बसविला. अर्थात कामगारांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्यामुळे त्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी संघटनेला आंदोलनाची हाक द्यावीच लागते. मग राज्य सरकार असो की केंद्र सरकार. दोन्ही सरकारांच्या कामगार धोरणांबद्दल आंदोलनाचे शस्त्र हे संघटनेला उपसावेच लागते. र. ग. कर्णिक यांचे नेतृत्त्व जसे धारदार होते तसेच ते अतिशय संयमी आणि समंजससुद्धा होते. कोणताही संप, कोणतेही आंदोलन कधी पुकारायचे आणि कधी मागे घ्यायचे, हे गणित भाई डांगे यांच्याप्रमाणेच कर्णिक यांनाही अवगत होते. कोणत्याही आंदोलनाची धार कायम कशी राहील, याची दक्षता ते सदैव घेत असत. त्यांच्या सभा प्रचंड प्रमाणात गाजत असत. मला आठवतं की सत्तरच्या दशकात कर्णिक यांच्या ज्वालाग्राही भाषणासाठी सकाळी नऊ वाजतासुद्धा नंदुरबारच्या अमृत चित्रपटगृहात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांचे ओजस्वी, ज्वालाग्राही आणि सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी केलेले हातवारे, त्यांचा जोश, आविर्भाव हा समोरच्या व्यक्तीला घायाळ करणाराच असे.

मी १९७५ ते १९७८ या काळात चर्नीरोड जवळच्या शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय येथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असताना राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने याच काळात दोन मोठे संप घडवून आणले होते. एक संप तब्बल ५४ दिवसांचा आणि दुसरा ३७ दिवसांचा. शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या मान्य केल्या नाहीत, त्याच मागण्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री झाल्यावर मान्य केल्या आणि या मागण्यांवर अर्थमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांना सही करावी लागली. ते जनता पक्षाच्या सहकार्याने शरद पवारांनी बनविलेले पुलोद सरकार होते. कामगारांच्या मागण्या मान्य करवून घेण्याची ही किमया घडवून आणली ती कर्णिक यांनीच. या दोन्ही संपांच्या वेळी निघालेल्या मोर्चात मी हातात कापडी फलक घेऊन हिरीरीने भाग घेतला होता. चळवळ ही आमची आवडती बाब असल्याने या धुरंधर नेत्यांशी आमची नाळ जुळली नाही तरच नवल. काळाच्या ओघात काय काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. याच चळवळीत रवि भागवत, आचरेकर, रामदास कदम, विजय सुर्वे आदी कामगार नेत्यांचा सहवास लाभला आणि मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम करताना कर्णिक यांच्या संघटनेच्या अगदी जवळ आलो.

याच धुरंधर नेत्याने आपल्या रत्नपारखी नजरेने सुनील जोशी, विश्वास काटकर, भालचंद्र साप्ते (गुरुजी), मिलिंद सरदेशमुख, अविनाश दौंड, विजय सुर्वे, दादा मंडलिक, गणेश बकशेट्टी, अनंत चव्हाण, शीतल गुप्ते, कविता ठोंबरे, सप्रे, विलास दळवी, गंगाधर मळीक, दत्ता कुंभार आदी असंख्य नेत्यांना आपल्या कामगार चळवळीच्या पंखाखाली घेतले. त्यांच्या नेतृत्त्वाखालील या संघटनेचा सुवर्णमहोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. तेव्हा कर्णिक यांनी वांद्रे पूर्व भागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आपले जुने सहकारी रतीलाल अखाणी यांचा सत्कार घडवून आणला. संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी मुंबई द्विभाषिक राज्यात सचिवालयात एकत्र कार्यरत असलेले अखाणी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्त्वात आल्यानंतर गुजरात राज्याच्या सचिवालयात स्थलांतरित झाले होते. त्यांना आवर्जून पाचारण केले होते आणि तेसुद्धा कर्णिकांच्या प्रेमाखातर उपस्थित राहिले होते. त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी समारंभाला एक चांगली उंची प्राप्त झाली.

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेले नेतृत्त्व कर्णिक यांचे होते. १९ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हृदय सिंहासनावर ते विराजमान झाले होते. कर्णिक यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेने केवळ आपल्या मागण्याच मांडण्याचे काम केले नाही तर सरकारच्या तिजोरीत तब्बल २५ हजार कोटी रुपयांची भर घालण्याची विधायक आणि राज्याला प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर नेण्याची सूचना सुचविण्याचेही काम केले आहे. राज्याच्या नेतृत्त्वाने अजूनही संघटनेच्या विधायक सूचनांचा विचार करून योग्य निर्णय घेतला, कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मागण्या स्वीकारल्या, आपलेच सरकार चालविणाऱ्या या आपल्याच कर्मचाऱ्यांचे समाधान केले तर तीच खरी श्रद्धांजली या कामगार चळवळीतील भीष्माचार्यांना मिळू शकेल. कोणत्याही राजकीय पक्षांच्या वळचणीला नेऊन ठेवण्यापेक्षा कामगारांचे स्वतंत्र अस्तित्त्व, त्यांचा स्वाभिमान अबाधित ठेवण्याचे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कार्य कर्णिक यांनी केले आहे. जयंत करंजवकर यांना कर्णिक यांचे जीवनचरित्र लिहिण्याची इच्छा होती. त्यांनी यासाठी तयारीसुद्धा केली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. र. ग. यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी शरद पवार स्वतः कर्णिकांच्या निवासस्थानी गेले होते. एखादी व्यक्ती एखाद्या पदावर गेली की सहसा ती त्या पदावरुन दूर होण्यासाठी तयार होत नाही. परंतु कर्णिक यांनी स्वतःहून सक्रिय कामगार चळवळीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. अर्थात त्यांचे मार्गदर्शन मध्यवर्ती संघटनेला कायम मिळत राहिले. कामगार चळवळीचा आत्माच रमाकांत गणेश कर्णिकांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. या कामगार चळवळीतील भीष्माचार्यांना मानाचा मुजरा!

Continue reading

समर्पिताः प्रेमकहाणी रमा आणि निशूची!

फार वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. अंबरनाथ त्यावेळी आजच्या इतकं सुधारलेलं/पुढारलेलं नव्हतं. १९७२ साली दी एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी उत्तीर्ण होऊन रमेश मुंबईत सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेचं उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. यातून त्याने सुवर्णपदकं...

जे हिंदुत्व बाळासाहेबांचे तेच खणखणीत हिंदुत्व उद्धव ठाकरेंचे!

महाराष्ट्र विधानसभेच्या एका निवडणुकीत मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील शिवसेना-भाजप युतीच्या जाहीर सभेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली आणि याच न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू. आमचे हिंदुत्व...

सुधा चुरीः लढवय्या महिलांचे स्फूर्तिस्थान!

शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले. गेल्या काही दिवसांपासून सुधाताईंची सतत आठवण येत होती. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि मी आम्ही...
Skip to content