महाराष्ट्रातील लोकायुक्त संस्थेकडे गेल्या पाच दशकांमध्ये चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळजवळ ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील गाऱ्हाण्यांचे समाधानकारक निवारण झाले असल्याचे लोकायुक्त कार्यालयाने नमूद केले आहे.

राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची काल मुंबईत राजभवन येथे भेट घेऊन त्यांना लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९वा एकत्रित वार्षिक अहवाल सादर केला. सन २०२१चा हा अहवाल आहे. या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयात एकूण ६,६१७ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली होती. त्यापैकी ३,२०२ प्रकरणे त्या वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२१च्या अखेरीस ३,४१५ प्रकरणे प्रलंबित राहिली, अशी माहितीही लोकायुक्त कार्यालयाने दिली.

