भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवाने (आयआयटी गोवा) अलीकडेच युवा संगम कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणारा हा एक उत्साहपूर्ण सांस्कृतिक विनिमय उपक्रम आहे. 15 ते 21 मे 2023पर्यंत, आयआयटी गोवाने हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील 50 सदस्यीय शिष्टमंडळाचे आदरातिथ्य केले. याने एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. विविध प्रदेशांतील तरुण व्यक्तींमधील (वय 18-30) परस्परसंवाद सुलभ करणे आणि चिरस्थायी बंध जोपासणे, त्यांना अनोख्या संस्कृतीचा शोध घेण्यासाठी आणि आजीवन मैत्री निर्माण करण्यास सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमादरम्यान आयआयटी गोवाने, गोव्याच्या सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन घडवणाऱ्या आणि सर्व सहभागींना समृद्ध करणारा अनुभव देणार्या उपक्रमांची आणि कार्यक्रमांची मालिका आठवडाभर आयोजित केली होती. या प्रवास कार्यक्रमात गोव्याच्या परंपरा, पाककृती, इतिहास, निसर्गसौन्दर्य यासह पर्यटन, परंपरा, प्रगती, परस्पर संपर्क आणि तंत्रज्ञान या सरकारने निश्चित केलेल्या क्षेत्रांची शिष्टमंडळाला सफर घडवून माहिती देण्यात आली.
युवा संगम कार्यक्रमाची सुरुवात 15 मे 2023 रोजी गोवा सरकारचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत झाली. त्यांनी फार्मगुडी येथील आयआयटी गोवाच्या तात्पुरत्या परिसरामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. गोव्यातील तरुणांनी हिमाचल प्रदेशात त्यांच्या स्वत:च्या सांस्कृतिक देवाणघेवाणीपासून हा प्रवास सुरू केला.

संपूर्ण दौऱ्यादरम्यान, सहभागींना शांतादुर्गा मंदिर, सफा मशीद, जुन्या गोव्यातील चर्च आणि प्रसिद्ध अगुआदा किल्ला यासह अनेक सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळे पाहण्याची संधी मिळाली. त्यांनी कोल्वा आणि कलंगुट समुद्रकिनारे, बिगफूट संग्रहालय कासा अल्वारेझ, जेल संग्रहालय या लोकप्रिय पर्यटनस्थळांचा आणि मांडोवी नदीमधील संस्मरणीय क्रूझ प्रवासाचा आनंद घेतला. गोवा शिपयार्ड, परादीप फॉस्फेट्स लिमिटेड, नौदल संग्रहालय आणि वास्को बंदर यासारख्या गोव्याच्या तांत्रिक सामर्थ्यावर आणि औद्योगिक कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या तांत्रिक स्थळांच्या भेटींचाही शिष्टमंडळाच्या प्रवासात समावेश होता. शिवाय, गोवा राज्य सरकारचे अधिकारी आणि मान्यवर यांच्याशी संवाद साधून यजमान राज्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि विकासात्मक पैलूंबद्दल मौल्यवान माहिती सहभागींना देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, तरुण प्रतिनिधींना 18 मे 2023 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि 19 मे 2023 रोजी गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली.
20 मे 2023 रोजी आयोजित सांस्कृतिक दर्शन घडवणाऱ्या भव्य कार्यक्रमाने युवा संगम कार्यक्रमावर कळस चढवला. या कार्यक्रमात सर्व सहभागींनी एकत्र येऊन आपापल्या संस्कृतींचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमात तिन्ही प्रदेशातील पारंपारिक नृत्य, संगीत आणि कला प्रकारांसह चित्तवेधक सादरीकरणे करण्यात आली. यामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे एकात्मता, सौहार्द आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे दर्शन घडले. गोवा सरकारचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहभागींना प्रोत्साहन दिले. परस्पर संवाद साधला आणि त्यांचा सत्कार केला. 22 मे 2023 रोजी शिष्टमंडळाने गोव्याचा निरोप घेतला.
आयआयटी गोवाचे संचालक डॉ. बी. के. मिश्रा यांनी युवा संगम कार्यक्रमाच्या उत्तुंग यशाबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला. तरुण मनांना जोडण्यासाठी, शिकण्यासाठी आणि एकत्र वाढण्यासाठी निर्माण केलेल्या या व्यासपीठाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला हातभार लावत या परिवर्तनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.