उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या भारतातील कला क्षेत्रातील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान केले, ज्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत राष्ट्रीय स्तरावरील एकही सन्मान मिळालेला नाही. पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 7 कलाकारांचा समावेश आहे.

यात लोककर्मी (तमाशा) हरिश्चंद्र बोरकर, कथक कलाकार चरण गिरधर चांद, पद्मा शर्मा, लोककला संशोधक प्रभाकर मांडे, लोक संगीत (तारपा) भिकल्या धिंडा, सतारवादक शंकर अभ्यंकर, उस्मान अब्दुल करीम खान यांचा समावेश आहे.

कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ.संध्या पुरेचा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे एका विशेष समारंभात उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारताच्या 5 हजार वर्षे जुन्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी माध्यमांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा आदर करण्याचे आवाहन केले आणि आपल्या कलाकारांना रचनात्मक पद्धतीने संरक्षण, समर्थन आणि सहाय्य करण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी बोलताना सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रात अथक परिश्रम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींचा आज आपण सन्मान करत आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे.

यावेळी सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे आणि कित्येक शतकांपासून विविध नृत्य, संगीत आणि नाट्य प्रकार अस्तित्वात आहेत. आपले बुजुर्ग कलाकार हे आपल्या सांस्कृतिक मूल्यांनी समृद्ध प्राचीन संस्कृतीचे नेतृत्व करत आहेत.

संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रातील कलाकार तसेच गुरु आणि विद्वानांना दिला जाणारा राष्ट्रीय सन्मान आहे. 1,00,000/- (रु. एक लाख) ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये हिंदुस्थानी कंठ्यसाठी रघुबीर मलिक आणि दिना नाथ मिश्रा, कर्नाटक कंठ्य साठी गोवरी कुप्पुस्वामी आणि अनसूया कुलकर्णी, भरतनाट्यमसाठी ललिता श्रीनिवासन आणि विलासिनी देवी कृष्णपिल्लई तर कुचीपुडी आणि ओडीशीसाठी अनुक्रमे स्मिता शास्त्री आणि कुमकुम लाल यांचा समावेश आहे. लोकसंगीतातील पुरस्कार विजेत्यांमध्ये झारखंडमधील महाबीर नायक, महाराष्ट्रातील हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांचा समावेश आहे.
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार विजेत्यांच्या अधिक माहितीसाठी खाली लिंक दिली आहे: