Homeकल्चर +१९ सप्टेंबरला भारतात...

१९ सप्टेंबरला भारतात झळकणार ‘साबर बोंडं’!

सनडान्स फिल्म फेस्टिव्हल पुरस्कारप्राप्त ‘साबर बोंडं’ (कॅक्टस पिअर्स) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून येत्या १९ सप्टेंबरला देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता राणा दग्गुबटी यांच्या स्पिरीट मीडियाकडून सिनेमाचे वितरण होणार आहे.

दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या ‘साबर बोंडं’ या चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँण्ड ज्युरी प्राईज, हा सर्वोच्च सन्मान पटकावून इतिहास रचला आहे. हा पुरस्कार मिळवणारा ‘साबर बोंडं’ हा पहिला भारतीय कथाभाष्यपट (फिक्शन) चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवाणे यासारख्या नामांकित कार्यकारी निर्मात्यांची भक्कम साथ मिळाली आहे. मुंबईत पार पडलेल्या विशेष पत्रकार परिषदेत या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. दिग्दर्शक रोहन कानवडे लिखित हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाईल. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून तब्बल १७ हजार चित्रपटांचे पुरस्कारांकरिता अर्ज गेले होते. ‘साबर बोंडं’ हा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शितही झाला. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरल्याने नवा इतिहास रचला गेला.

हा चित्रपट आनंद नावाच्या शहरी तरुणाच्या आयुष्यभोवती फिरतो. आनंद आपल्या व्यक्तिगत आयुष्यात दुःखी आहे. कौटुंबिक दडपणात जगणाऱ्या आनंदला एकदा आपल्या मूळगावी जावे लागते. अंत्यसंस्कारानंतरच्या दहा दिवसांच्या विधीसाठी आनंद आपल्या गावी परततो. पश्चिम महाराष्ट्राच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या गावात आनंदला त्याचा बालपणीचा मित्र बाल्या भेटतो. बाल्याच्या संपर्कात आल्यावर आनंदच्या दुःखावर फुंकर घातली जाते. या चित्रपटात अभिनेता भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप यांचा सशक्त अभिनय पाहायला मिळतो. प्रेम आणि मैत्रीच्या नाजूक बंधांचा या चित्रपटात हळुवारपणे वेध घेतला गेला आहे.

हा चित्रपट आता भारतभर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. उत्तर अमेरिकेतही तो प्रदर्शित केला जाईल. उत्तर अमेरिकेतील स्ट्रँण्ड रिलीजिंग, या प्रसिद्ध आर्टहाऊस बॅनरकडून या चित्रपटाचे वितरण केले जाईल. भारतात स्पिरीट मीडियाने या चित्रपटाचे वितरण केले आहे. स्पिरीट मीडियाने यापूर्वी प्रसिद्ध कान्स ग्रँड प्रिक्स विजेता ऑल वी इमॅजिन अॅज लाईट इन इंडियाचे वितरण केले होते.

हा चित्रपट शहरी निवासी आनंदच्‍या अवतीभोवती फिरतो, जो वैयक्तिक नुकसान आणि कौटुंबिक दबावांशी झुंजत असताना त्याच्या वडिलोपार्जित गावात १० दिवसांच्या शोकविधीला सुरुवात करतो. पश्चिम भारतातील खडतर स्थितीमध्‍ये, त्याला त्‍याचा बालपणीचा मित्र बाल्याकडून सांत्वन व आधार मिळतो, जो त्‍याच्‍यासारख्‍याच सामाजिक अपेक्षांचा सामना करत असतो. भूषण मनोज, सुरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्यासारखे उत्‍कृष्‍ट कलाकार असलेल्‍या या चित्रपटाचे कथानक आव्हानात्मक परिस्थितीत निर्माण झालेल्या वैयक्तिक नातेसंबंधांच्या गुंतागुंतींना नाजूकपणे सादर करते. 

अनेक चित्रपटांपैकी एक असलेला साबर बोंडं (कॅक्टस पिअर्स) या चित्रपटाने या वर्षाच्‍या सुरूवातीला इतिहास रचला, जेथे सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये विजेता म्‍हणून पहिला भारतीय काल्पनिक चित्रपट ठरला. या चित्रपटाला प्रतिष्ठित ग्रँड ज्युरी प्राइझसह सन्‍मानित करण्‍यात आले. जगभरातील हजारो सबमिशनमधून निवडण्‍यात आलेला हा स्‍पर्धेमधील भारतातील एकमेव चित्रपट होता आणि फेस्टिवलमध्‍ये प्रीमियर करण्‍यात आलेला पहिला मराठी भाषिक चित्रपट म्‍हणून आणखी एक टप्‍पा गाठला. ज्युरीच्या प्रशस्तिपत्रात म्हटले आहे की, ही एक महान आधुनिक प्रेमकथा आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळणे हा सन्मान आहे असे म्हणणेदेखील कमी लेखण्यासारखे आहे. चित्रपट पाहताना आमच्‍या डोळ्यांमध्‍ये अश्रू आले. आम्‍ही हसलो आणि आमच्‍यामध्‍ये त्याचप्रकारे प्रेम मिळावे अशी इच्छा निर्माण झाली. जगाला सध्या याचीच गरज आहे. कथानकामधील प्रामाणिक दृष्टिकोन आपल्‍या सर्वांमध्‍ये जिव्‍हाळ्याची भावना जागृत करतो. आपल्‍याला या चित्रपटामधील प्रमुख पात्रांच्‍या अंतर्गत जीवनाच्‍या हृदयस्‍पर्शी भावना जाणवतातआणि या भावना व्‍यक्‍त होतात तेव्‍हा आपण कथानकामध्‍ये भारावून जातो.

या चित्रपटाने जगभरात प्रवास केला आहे. २५हून अधिक आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तो प्रदर्शित झाला आहे. तसेच बेस्‍ट फिचर फिल्‍म, ऑडियन्‍स चॉईस अवॉर्ड्स आणि एसएक्‍सएसडब्‍ल्‍यू लंडन, सॅन फ्रान्सिस्‍को इंटरनॅशनल फिल्‍म फेस्टिवल, आयएफएफएलए अशा प्रतिष्ठित व्‍यासपीठांवर त्याने सन्‍माननीय उल्‍लेखांसह प्रशंसा मिळवली आहे. जगभरात प्रशंसा होण्‍यासह या चित्रपटाने सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट म्‍हणून ख्‍याती मिळवली आहे. आता अखेर भारतात प्रदर्शित होण्‍यासाठी तो मायदेशी परतला आहे. साबर बोंडंच्या भारतात रीलीजसाठी सहयोग करण्‍याबात स्पिरीट मीडियाचे राणा दग्गुबाती म्हणाले की, स्पिरीट मीडियामध्ये आम्ही भाषा आणि सीमांच्या पलीकडे जाऊ शकणाऱ्या उत्तम कथांना पाठिंबा देतो. या सिनेमाने भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर नवीन उंचीवर नेले आहे. या चित्रपटात असा प्रामाणिकपणा आणि कोमलता आणण्‍याचे सर्व श्रेय रोहन यांना आणि या चित्रपटाच्या प्रवासाला पाठिंबा दिल्याबद्दल निर्मात्यांना जाते.

या चित्रपटाचा प्रवास आणि भारतातील रीलीजबाबत मत व्‍यक्‍त करत लेखक व दिग्‍दर्शक रोहन कानवडे म्‍हणाले की, स्पिरीट मीडिया भारतात साबर बोंडंचे वितरण करणार असल्‍यामुळे अविश्वसनीय क्षण वाटत आहे. या चित्रपटामध्‍ये माझ्या जीवनातील अनुभवांना प्रेम, स्‍वीकृती व स्थिरतेबाबत कथानकामध्‍ये सादर करण्‍यात आले आहे. जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाचे केलेले कौतुक पाहून खूप आनंद होत आहे. भारतात हा चित्रपट प्रदर्शित करण्‍याचे वेगळे समाधान आहे. या सहयोगाबाबत मला उत्‍साहित करणारी बाब म्‍हणजे चित्रपट प्रदर्शित करण्‍यासोबत त्‍यामधून मिळणारी शक्‍यता, जसे प्रादेशिक, वास्‍तविक व भावनिकदृष्‍ट्या प्रामाणिक भारतीय कथांना येथे थिएटरमध्‍ये वाव मिळण्‍याची आणि आपल्‍या मोठ्या सांस्‍कृतिक वारसामध्‍ये स्‍थान मिळवण्‍याची संधी आहे.

व्हेनिस बिएनाले कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ व एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्पअंतर्गत विकसित केलेला आणि फिल्म लंडन प्रोडक्शन फायनान्स मार्केट, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प, फिल्म बाजार को-प्रोडक्शन मार्केट, व्हेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट आणि गोज टू कान्ससारख्या जागतिक व्यासपीठांवर सादर केलेला साबर बोंडं (कॅक्टस पिअर्स) आंतरराष्‍ट्रीय सहयोगी प्रयत्‍नामधील उत्‍कृष्‍ट प्रतिभांना दाखवतो. निर्माते नीरज चुरी (यूके), मोहम्मद खाकी (कॅनडा), कौशिक रे (युके), नरेन चंदावरकर (भारत), सिद्धार्थ मीर (भारत) आणि हरीश रेड्डीपल्ली (भारत), तसेच सह-निर्माता नेहा कौल व प्रशंसित अभिनेता जिम सर्भ आणि सहयोगी निर्माता राजेश परवटकर यांच्यासह या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्‍टीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

रोहन कानवडे यांच्‍याबद्दल

रोहन एका सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यांचे संगोपन मुंबईतील झोपडपट्टीमधील एका खोलीच्या घरात ड्राइव्हर वडिलांनी आणि अशिक्षित गृहिणी आईने केले आहे. त्‍यांनी इंटीरियर डिझाइन केले असून स्वयंनिर्मित चित्रपट निर्माता आहेत. त्यांचे लघुपट जागतिक स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. त्यांचा पहिला चित्रपट साबर बोंडं (कॅक्टस पिअर्स) व्हेनिस बिएनाले कॉलेज सिनेमा २०२२-२०२३मध्ये आर्म्स ऑफ अ मॅन या शीर्षकाखाली विकसित करण्यात आला होता. हा चित्रपट फिल्म लंडन प्रोडक्शन फायनान्स मार्केट २०२१, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प २०२१, फिल्म बाजार २०२२, व्हेनिस गॅप फायनान्सिंग मार्केट २०२३ आणि गोज टू कान्स २०२४चादेखील भाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करणार आहेत. आज ते मिझोराम, मणिपूर तसेच आसामचा दौरा करणार...

दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे,...

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला...
Skip to content