मुबई आणि ठाणे शहरातील खड्यांबाबत नेहमीच बोलले जाते, लिहिले जाते. परंतु शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे रस्ते अतिशय भयानक अवस्थेत असतात असे अनेक वाचकांनी कळवले आहे. तुम्ही शहरातील पत्रकार शहरातील रस्त्यांबाबत बाराही महिने रडत असता, जरा गावाकडे चला, रस्त्यांची केवळ दुर्दशाचं पाहाल असे अनेकांनी सांगितले. यात तथ्यही आहे. म्हणूनच गेल्या आठवड्यात ठाण्याजवळील भिवंडीकडे जाणारा रस्ता निवडला.
बाळकूमपर्यंत ठाणे महापालिकेची हद्द आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारितील रस्ता सुरू होतो. बाळकूमपासून जेमतेम अर्धा / पाऊण किलोमीटर गेलो नसेल तोवरच रस्त्यातील खड्यांमुळे गाडी डुगडुगायला लागली. केळशी-काल्हेरपर्यन्त जाताना नाकीनऊ आले. काही ठिकाणी तर अर्धा किलोमीटरपर्यन्त खड्डेच खड्डेच होते. त्यातील अनेक खड्डे बरेचसे खोलही होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि जिल्हाधिकारी शिनगारे यांनी एकत्रित या भागाचा पाहणीदौरा करणे गरजेचे आहे. म्हणजे या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही खड्ड्याचा कसा त्रास होतो याचा थोडातरी अंदाज येईल. कारण दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसे हैराण व्हायला होते ते त्यांना समजेल.

या खड्ड्यामुळे रिक्षा व बाईक्स अक्षरशः उड्या मारत असतात असेच वाटते. हा रस्ता बांधायला बरेच दिवस लागतील हे कळते. परंतु रस्तादुरुस्तीला तर वेळ लागणार नाही ना? या रस्त्याची दुर्दशा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून अशीच असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री पाटील तर अद्याप एकदाही या रसत्यावरून गाडीने गेलेले नाहीत. ते नेहमीच हेलिकॉपटरने आपल्या मतदारसंघात (भिवंडी) येतात असे समजले.
“The bitterness of poor quality remains long after the sweetness of low price is for long” हे आपल्या राजकीय नेते व बाबू मंडळींना कधी कळणार हे त्या ‘रामा’लाच ठाऊक! तसेच “government is accountable to the voters focus of building roads, schools not weapons of mass destruction” हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना तरी दोष देऊन काय फायदा? त्यांच्या हातात तर केवळ रिकाम्या तिजोरीच्या चाव्या असतात. ही मंडळी शोभेसाठीच असतात. खरेतर लोकप्रतिनिधिनींच याविरोधी आवाज उठवला पाहिजे. परंतु सत्ताधाऱ्यांनी सर्वाना जणू शेंदूर खाऊ घालून त्यांचा आवाजच बसवला असावा…

