मुंबईतल्या ‘के पश्चिम’ विभाग हद्दीमध्ये, अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १,२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची लोखंडी झडप (वर्किंग मॅनहोल) काल, बुधवारी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास निखळल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आणि या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. हे समजताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेत जलवाहिनी दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले. अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करत तब्बल आठ तास अव्याहतपणे काम करत बुधवारी रात्री अकरा वाजता जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे लोखंडवाला संकुल परिसर, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसराचा आज, गुरूवारचा पाणीपुरवठा नियितपणे आणि सुरळीत झाला.
उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर जलबोगदा ते मिल्लत नगर दरम्यानची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आदर्श नगर रस्ता येथे फुटली. वेल्डिंग केलेली लोखंडी झडप (वर्किंग मॅनहोल) निखळल्याने पाणी बाहेर वाहू लागले. त्यानंतर पालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सदर जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा तत्काळ बंद करुन पाणीगळती त्वरेने थांबवली. त्यानंतर लगेचच जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. जलवाहिनीतून पाणीउपसा केल्यानंतर वर्किंग मॅनहोल नव्याने बसविण्यात आले. यानुसार १५ जणांच्या चमूने सलग आठ तास कार्य करत जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण केले.
याबाबत अधिक माहिती देताना जल अभियंता (प्र.) पुरुषोत्तम माळवदे यांनी कळविले आहे की, पालिकेच्या वतीने मुंबईकरांना विनाव्यत्यय व नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येतो. भूमिगत तर काही ठिकाणी उन्नत जलवाहिनीदवारे हा पाणीपुरवठा केला जातो. तथापि, भूमिगत जलवाहिनीस गळती झाल्यास, पाणीपुरवठयाकामी व्यत्यय आल्यास दुरूस्ती कामे करता यावी, यासाठी जलवाहिनीवर काही ठिकाणी वेल्डिंग करून लोखंडी झडप (वर्किंग मॅनहोल) कार्यान्वित ठेवण्यात येते, जेणेकरून अधिकारी-कर्मचाऱ्यांना जलवाहिनीतील बिघाड नेमका कोठे झाला हे समजून दुरूस्ती काम करणे शक्य असते. काल अंधेरी येथे झालेल्या जलवाहिनीची अशाच प्रकारची झडप निखळल्याने सदर घटना घडली.

