Homeचिट चॅटप्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची...

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची ‘वारकरी संतपरंपरा’!

महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे.

महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी कँटॉन्मेंट परिसरातील राष्ट्रीय रंगशाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या  पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रजासत्ताकदिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टे दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या वारकरी संतांची थोर परंपरा दर्शविणारा चित्ररथ सादर करण्याचा निर्णय झाला आणि विभागाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सुंदर व सुबक चित्ररथ तयार केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक ‍बिभीषण चवरे यांनी  परिचय केंद्राशी  बोलताना सांगितले.

वारकरी संत व समकालीन संतांनी जाती व्यवस्था, विषमता आणि अंधश्रध्देविरोधात आवाज उठवत समाजप्रबोधनाचे महान कार्य केले आहे. हीच संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 8 फूट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीसमोर ‘ज्ञानेश्वरी ग्रंथ’ दर्शविण्यात आला आहे. चित्ररथाच्या  मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस झालेले संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारीत ‘भक्ती आणि शक्ती’चा संदेश देणारे प्रत्येकी 8 फूट उंचीचे फिरते पुतळे आहेत. या पाठोपाठ राज्यातील वारकरी संतांचे व भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी या चित्ररथावरील 8.5 फूट उंचीची लोभस मूर्ती भक्तीभावाचे मूर्तीमंत रुप घेऊन अवतरली आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात 8 फूट उंचीचा ‘संतवाणी’ हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महम्मद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत.

या कलाकारांनी उभारला चित्ररथ

राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती नागपूर येथील टीम शुभचे रोशन इंगोले (केळझर, वर्धा)  आणि तुषार प्रधान (यवतमाळ) या कलाकारांनी तयार केले आहेत. कला दिग्दर्शक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 30 कारागीरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.

तांत्रिक कौशल्यही आहे विशेष

या चित्ररथावर एकूण चार फिरत्या मूर्ती साकारण्यात आल्या असून त्यासाठी यवतमाळ येथील राजेश टेंभरे आणि अंकुश टेंभरे या पिता-पुत्रांनी तंत्रज्ञ म्हणून चोख भूमिका वठवली आहे. टाकावू वस्तुंचा वापर करून या पिता-पुत्रांनी चित्ररथावरील शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांच्या भेटीची मूर्ती, पांडुरंगाची कटेवर हात असलेली मूर्ती, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्या फिरत्या मूर्ती उत्तमरित्या कार्यन्वित केल्या आहेत.

चित्ररथावर चार कलाकार देणार प्रस्तुती

वारकऱ्यांच्या वेशात मृदंग, टाळ आणि विणाधारी  चार कलाकार चित्ररथावर प्रस्तुती देणार आहेत. याशिवाय चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी चार कलाकार वारकऱ्यांच्या भूमिका साकारणार आहेत. ठाणे येथील कलांकुर गृपचे 12 कलाकार या भूमिका साकारणार आहेत.

‘विठुचा गजर..’ गीत आणि वारकऱ्यांचा नामघोष

राजपथावरील प्रमुख पाहुण्यांसमोर चित्ररथ येताच येथे होणाऱ्या सादरीकरणात ‘विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हे विठ्ठलाचा महिमा सांगणारे गीत ऐकायला मिळणार आहे. यासोबत ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग-पांडुरंग’ हे वारकरी संप्रदायातील प्रसिध्द नामघोष ऐकविण्यात येणार आहेत.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content