उरल्यासुरल्या शिवसेनेला खच्ची करण्यासाठी आणि मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील लढाई जिंकण्यासाठी आता मुंबई महापालिकेने मारलेल्या उंदरांसंदर्भातही राज्य सरकारने चौकशी लावली आहे.
मुंबई महापालिकेने उंदीर मारण्यासाठी खर्च केलेल्या एक कोटी रुपयांच्या खर्चाची आणि एकूणच या मोहिमेची राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत विशेष समिती नेमून चौकशी केली जाईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले.
राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात करावयाच्या उपाय योजनांसंदर्भात काही आमदारांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात सावंत यांनी ही घोषणा केली.
मुंबई महापालिकेने प्लेगच्या साथीच्या अनुषंगाने उंदीर मारण्याची मोहीम हाती घेतली होती आणि त्यासाठी एक कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले आहे. पाच उंदीर मारल्याचे त्यावेळी समोर आले होते, असे सांगून भाजपा सदस्य आशिष शेलार यांनी विचारणा केली की मुंबई महापालिकेचे कर्मचारी उंदीर मारताना कधीही दिसलेले नाहीत तर मग हा खर्च नेमका कशावर झाला… शेलार यांनी विचारणा केली की ,मुळात एक कोटी रुपये उंदीर मारण्यासाठी खर्च झाले हे खरे आहे काय… तसे असेल तर नेमके किती उंदीर मारले… शेलार यांनी उंदीर मारण्याचे काम दिलेल्या कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणीही केली.

सावंत यांनी जाहीर केले की, या सर्व गोष्टी घडल्या आहेत का आणि त्यासाठी एक कोटी रुपये खर्च झालेत का, यासह या विषयाची सर्वंकष चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल आणि या प्रकाराची चौकशी केली जाईल.
विरोधकांचा फोन टँपिंगवरून सभात्याग
फोन टँपिंग प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधानसभेत पुन्हा एकदा उमटले आणि सर्व विरोधी पक्षांनी या प्रश्नावरून सभागृहात निदर्शने करून अखेर सभात्याग केला. काँग्रेसचे नाना पटोले यांनी या संदर्भातील स्थगन प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी त्यांच्या दालनातच नाकारला होता. मात्र, दोन मिनिटे बोलण्याची संधी मिळाल्यानंतर नाना पटोले यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपांमधून त्यांना मोकळे करण्यासाठी या सरकारने घाईघाईने प्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट का सादर केला, असा सवाल केला होता.
या प्रश्नावरून अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले की हा स्थगन प्रस्ताव नाकारलेला आहे आणि सदन नियमानुसार चालवले जाईल. विरोधकांनी सभागृहाच्या वेलमधे धाव घेत घोषणा दिल्या आणि सभागृहात पाच मिनिटे गदारोळ माजला. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या विषयावर भाष्य केले आणि सरकारवर रश्मी शुक्ला यांना झुकते माप दिल्याचा आरोप केला. अध्यक्ष नार्वेकर यांनी पुन्हा स्पष्ट केले की नाना पटोले यांनी नियमानुसार वेळेत नोटिस दिलेली नसल्याने त्यांचा स्थगन प्रस्ताव दालनातच नाकारला होता. पण तरीही त्यांच्या भावना लक्षात घेऊन दोन मिनिटे बोलण्याची संधी दिली होती. कारण, प्रश्नोत्तराच्या तासात जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होणे आवश्यक आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आमचा समज झाला असल्याने आम्ही सभात्याग करत आहोत, असे जाहीर केले. त्यानंतर सर्व विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर पुढचा अर्धा तास सर्व प्रश्नोत्तरे विरोधकांच्या अनुपस्थितीतच झाली.

