देशभरात सध्या चैत्री नवरात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने घराघरांत संपन्न झाली नि रामनवमीचेही तसेच आहे. राम मंदिर निधी संकलनाने देशातील वातावरण ढवळून निघाले असले तरी अत्यंत साधेपणाने यंदा प्रभू श्रीराम जन्मदिन साजरा करावा लागणार आहे. बऱ्याच राज्यांतून कोरोना विषाणूचा जोर वाढत आहे. त्यामुळे घरात राहून मोजक्या लोकांसह राम जन्म साजरा करावा लागेल.
देशाच्या प्रमुख आराध्य दैवतांपैकी एक असलेल्या, अयोध्या जन्मभूमी असलेल्या दशरथ नि कौसल्या सुपुत्र रामाचा चैत्र शुद्ध नवमी हा जन्म दिन! आता तर विदेशात स्थायिक झालेल्या हिंदू भारतीय समाजाकडून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांत अयोध्येबाबत बरेच निर्णय नि तेही सर्वसंमतीने झाल्याने देशात शांतता आहे. 2020ला राम मंदिर पायाभरणी झाली. आताच्या जानेवारी 15पासून महिनाभर निधी संकलन झाले. त्यापूर्वी 2019मध्ये न्यायालयीन निवाडा आला. अशा उत्साहवर्धक घटनांनी राम भक्त आनंदित होते. पण वाढत्या कोरोनाने त्यावर पाणी फिरवले आहे.
या नैराश्याच्या काळात राम नाम आपल्याला तारून नेईल अशी अनेकांची श्रद्धा आहे. दैव नि प्रयत्नवादाची सांगड घालणारेही अनेक आहेत. देव ही शक्ती आहे की नाही हा अनेकांच्या वादाचा विषय असला तरी अनेकांना भक्तीतून मानसिक बळ मिळते ते कोणी विज्ञानाच्या कसोटीवर घासून तपासून पाहू शकत नाही. रामरक्षा हे स्तोत्रच असे आहे की त्यात संपूर्ण शरीराचे नव्हे तर मन नि आजूबाजूच्या वातावरणातील लहरी बदलून अंतर्बाह्य शुद्धीकरण घडावं अशी कामना व्यक्त केलीय. यात रामाची स्तुती तर आहेच शिवाय सिद्ध मंत्रदेखील दिले आहेत.
याची सुरुवातदेखील “अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रमंत्रस्य” याने झाली आहे. यावरून स्तुती स्तोत्र तर आहेच शिवाय मंत्ररूपी रक्षात्मक कवच सुद्धा आहे. ‘जपे विनियोगा’ हे याचा सारखा जप करून अनुभव घ्या सांगते, तर ‘पठेत प्राज्ञ पापघ्नी सर्वकामदाम’ हे शब्द स्तोत्र असल्याचे सांगतात. वास्तविक हे स्तोत्र बुध कौशिक ऋषींनी शंकरांनी पार्वतीला स्वप्नात सांगितल्याचे पाहिले. सकाळी जाग येताच ते त्यांनी लिहून काढले. रामनामाची महती ही भगवान विष्णूच्या हजार नावाइतकी श्रेष्ठ आहे. त्याचा उल्लेख ‘सहस्त्रनाम ततुल्यम रामनामे वरानने’ अशा ओळीने आढळतो.
या स्तोत्रात डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण माझा राम करो असे म्हटलं आहे. इतकं लक्षात घेतलं की या शरीरात ‘राम’ राहो यासाठी या स्तोत्राची रचना झाल्याचे दिसते, समजते. डोक्यापासून सुरुवात केली तर ‘शिरो मे राघव पातु: – शरीराचा सर्वात श्रेष्ठ भाग म्हणजे मस्तक. रघु कुळात सर्वात श्रेष्ठ कोण राम, त्याने माझ्या मस्तकाच्या रक्षण करो. कौसल्येयो दृशौपातु: आई नेहमी आपल्या मुलाकडे नेहमी नैसर्गिक अशा स्नेहपूर्ण नजरेने पाहते. त्यात रक्षणाचा मातृभाव असतो तसे कौसल्या पुत्र रामाने माझ्याकडे पाहून डोळ्यांचे रक्षण करो.
विश्वामित्र श्रुती पातु: रामाचे गुरू विश्वामित्र. सर्व शस्त्रास्त्र विद्या त्यांच्याकडून प्राप्त झाली. गुरुचे ऐकणे हे शिष्याचे कर्तव्यच! ती विद्या कान देऊन ऐकली त्या रामाने माझ्या कानांचे रक्षण करो. घ्राणं पातु: मखत्रता घ्राण म्हणजे नाक, मख म्हणजे यज्ञ यज्ञमुळे पर्यावरणाचे रक्षण होते. रामाने राक्षस वर्गापासून ऋषींच्या यज्ञाचे रक्षण केले. पर्यावरणाचा नि नाकाचा जवळचा संबंध म्हणून यज्ञ रक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे रक्षण करावे.
जिव्हा विद्यानिधी पातु: जिभेचे काम बोलणे नि तिच्या शिवाय विद्या कशी येणार म्हणून तिचे रक्षण विद्यानिधी श्रीरामाने करावे. कंठं भरतवंदिता योगमहर्षी पतंजलीनी योग शास्त्रात एक प्रयोग सांगितला आहे. जर कंठाच्या ठिकाणी आत्मसंयम केला तर बला नि अतिकला सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे तहान नि भूक यावर विजय मिळवता येतो. या दोन्ही सिद्धी विश्वामित्रांनी रामाला दिल्या होत्या. त्यामुळेच रामाने माझ्या कंठाचे रक्षण करावे.
असे करत या सर्व भागात शरीरातील सर्व अवयव येतात. स्कंध म्हणजे खांदे, भुजौ बाहू म्हणजे दंड, करौ म्हणजे हात, क्रोधामुळे रक्तदाब वाढतो, त्यातून हृदयरोग होतो हे विज्ञानसुद्धा सांगते. जमदग्नी म्हणजे परशुराम.ते क्रोधाचे रूप. त्यामुळे रामाने हृदयाचे रक्षण करावे, हृदयं जामदगन्यजीत: नाभीच्या आश्रयाने शरीरातील प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे वायू सुस्थितीत असतात. त्यामुळे माझ्या नाभीचे रक्षण व्हावे. श्रीरामाच्या चरणाशी लीन होताच बिभीषणाला राज्यवैभव मिळाले तसेच माझ्या पावलांचे रक्षण व्हावे.
जो अखिल जगताला रमवतो अशा रामाने माझे अखिल संपूर्ण शरीर रक्षण करावे या उल्लेखाने राम रक्षा संपते. त्यापुढील भागात याची फलप्राप्ती सांगणारे श्लोक आहेत. संपूर्ण शरीर रक्षणावर भर असलेलं बहुधा हे एकमेव स्तोत्र असावं. रामरक्षा स्तोत्राचे सामर्थ्य नि त्यातल्या श्लोकाच महत्त्व अनेकदा वाचनात आलं असेल. रोजच्या जीवनात कोणत्याही प्रहरी ती म्हटली तरी स्पंदने जागृत होतात. अनेकांना केवळ ‘स्वानुभव’ या साधनेतून याची प्रचितीही आली असेल. एकाच दिवशी एकाच वेळेस लाखो लोकांनी रामरक्षा पठणाचा संकल्प केल्यास वातावरणात एक मोठी सकारात्मक ऊर्जा तयार होईल.
दिवसेंदिवस मनुष्य नि विज्ञान हतबल होताना दिसतेय. त्याच्या जोडीला त्याचं सामर्थ्य नि मनोबल वाढवण्यासाठी रामरक्षेसारख्या प्रभावी मंत्र पठणाची गरज आहे.लाखो करोडो लोकांच्या मुखातून एकाच वेळी निघालेल्या या स्तोत्राचे सकारात्मक परिणाम निश्चित दिसतील, काहीतरी चांगलं घडेल. त्यासाठी बुधवार 21 एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता किमान एक वेळा नि शक्य असल्यास 11 वेळा जमेल त्या मोठ्या आवाजात सगळे एकत्र श्रीरामरक्षा म्हणूया! त्यातील प्रत्येक मंत्राची वायब्रेशन चराचरात घुमू देत. राम हा तेजस्वी, सूर्यवंशी होता. त्याचबरोबर रामाचे कार्य हे राक्षसी प्रवृत्तीचा,राक्षस नाश करणे हे होते. संध्याकाळपासून राक्षसी वृत्ती प्रबळ होतात. तेव्हा शारीरिक, मानसिक तमोगुणापासून आपले रक्षण व्हावे यासाठी रामरक्षा संध्याकाळी अथवा रात्री म्हणावी हेच उत्तम! जय श्रीराम!