Wednesday, October 16, 2024
Homeपब्लिक फिगरगावोगावी दवंडी द्या!...

गावोगावी दवंडी द्या! २४ तास कॉलसेंटर सुरू ठेवा!!

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या, असे निर्देशही त्यांनी दिले.  

ते काल वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ. के एच गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव कलोते यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव (साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल. अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.

सामाजिक भावनेने काम करण्याचे आवाहन

मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असून प्रशासनानेसुद्धा या अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये पूर्णशक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.  

मुख्यमंत्री म्हणाले की, हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावे. गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या, ग्रामपंचायतीच्या फलकांवर सुचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे, म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचा अहवाल द्यायचा आहे.  

२४ तास कॉल सेंटर सुरु ठेवा

यावेळी गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाखपेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहेत, असे ते म्हणाले. ३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरू झाले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालातदेखील प्रशिक्षण सत्र, बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा. न्या. गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. २००८मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे, हे व्यवस्थित तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा

कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्त्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत, तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा, असे मुख्यमंत्री म्हणाले.   

ऑक्टोबरपासून १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरीत

निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरू केल्यापासून १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे संबंधिताना वितरीत करण्यात आली आहेत. एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या. संदीप शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे, अशी माहिती सुमंत भांगे यांनी यावेळी दिली.

Continue reading

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...

जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट ‘अंत्यारंभ’ नोव्हेंबरमध्ये!

किरणमयी आर कामथ निर्मित 'अंत्यारंभ', हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन प्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय, पुणे...
Skip to content