देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकणाऱ्या चीनच्या नागरिकाला भागीदार म्हणून घेणाऱ्या अदानी समुहाच्या आर्थिक व्यवहारांची जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केली.

आजपासून मुंबईच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 28 पक्षांच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी आल्यानंतर एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. ब्रिटनच्या एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी आणि त्यांच्या दोघा भागीदारांनी भारतातून एक बिलियन डॉलर परदेशात पाठवले. त्यानंतर हेच पैसे पुन्हा भारतात आले. हे पैसे कोणाचे आहेत? ते जर अदानींचे असतील तर तसे स्पष्ट करा. नाही तर ते कोणाचे आहेत, यामागे मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.

अदानी समुहातल्या या दोन भागीदारांपैकी एक भागीदार चँग चुग लिंग चीनचा भागीदार असून चीन हे भारतासाठी धोकादायक राष्ट्र आहे. अदानी संरक्षण मंत्रालयातही कामे घेतात. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मग अशावेळी या साऱ्या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सेबीने अदानी समुहाला क्लीन चिट दिलेली आहे. ही क्लीन चिट देणारे तत्कालीन अध्यक्ष आता अदानींच्या एका वृत्तवाहिनीच्या संचालकपदावर काम करत आहेत. त्यामुळे या चौकशीबद्दल संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच अदानी समुहाच्या व्यवहारांची जेपीसीमार्फत चौकशी केली गेली पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी केली.

