‘संगीत वस्त्रहरण’, या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तिमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे. कलेच्या नावाखाली विकृतीपणा कलेसाठी तर घातक आहेच; त्याहीपेक्षा समाजापुढे आदर्शांचे भंजन करून समाजालाही अंध:पतनाकडे नेणारा आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावणे हे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकावर कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच तसेच यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने याविषयी शनिवारी नवी मुंबई येथील वाशी पोलीसठाण्यात तक्रार नोंदवली आहे तसेच नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनासुद्धा याविषयीचे निवेदन सादर केले आहे. १५ ऑगस्टला मुंबईतील विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या व्यतिरिक्त मुंबईमध्ये काही ठिकाणी या नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.
कोकणात नमन मंडळे, नाट्यमंडळे दशावतार सादर करतात. अशाच प्रकारे एक मंडळ ‘वस्त्रहरण’ हे नाट्य सादर करताना रंगमंचावर पडद्यामागील घडामोडी आणि प्रत्यक्ष नाट्य सादर करताना झालेली फजिती यामध्ये मांडण्यात आली आहे; मात्र हे करताना पांडवांची जाणीवपूर्वक चेष्टा करण्यात आली आहे आणि त्यातून पाचकळ विनोद करण्यात आले आहेत, असे या तक्रारीच्या निवेदनात म्हटले आहे.
अर्जुनाचे काम करणारा पात्र मद्य पिऊन तर्र झालेला, आचकट विचकट चाळे करताना दाखवण्यात आला आहे. नाटकाच्या प्रारंभीपासून ते शेवटीपर्यंत रंगमंचावर काम करताना आणि त्यामध्ये अर्जुनाची भूमिका साकारताना हा कलाकार मद्यामध्ये तर्र होऊन भूमिका करताना दाखवला आहे. विदूर जे महाभारतातील ज्ञानी व्यक्तिमत्त्व आहे, त्या थोर पात्राला विडी ओढताना दाखवले आहे तसेच विदूर आणि युधिष्ठिर तमाशातील बाईसोबत रंगमंचावर नाचताना दाखवले आहे. भारतवर्षातील पराक्रमी पुरुषात अग्र असलेले भीष्म रंगमंचावर ‘बिलाची नागीण निघाली’ या गाण्यावर नाचत येतात. रंगमंचावर आचकट-विचकट चाळे करताना त्यांना नाट्यात दाखवण्यात आले आहे. संगीत वस्त्रहरण नाट्यामध्ये द्रौपदीची भूमिका करणारी महिला अर्वाच्च्य भाषेत भांडत असलेली दाखवली आहे. ती स्वत:च्या साडीचा पदर पुढे करून कौरव आणि पांडव यांना स्वत:चे वस्त्रहरण करण्यास सांगताना दाखवली आहे. हे या नाटकातील केवळ प्रातिनिधिक प्रसंग आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये आदर्श असलेल्या व्यक्तिमत्त्वांची चेष्टा करून ते कलेच्या नावाने खपवले गेले, तर भविष्यात प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमंत, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींवरही विनोद केले जातील. समाजात आधीच अनैतिकता वाढत आहे. अशात आपल्या संस्कृतीत आदर्श असलेल्या व्यक्तीमत्त्वांवरही चेष्टा होऊ लागली, तर नैतिक अध:पतनाला साहाय्यभूत होईल आणि आपणाला हे परवडणारे नाही.
भारताच्या राज्य घटनेतही प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्याच्याआधारे हिंदूंना हिंदूंच्या धार्मिक भावनांचे जपण्यासाठी आणि या सर्व सामाजिक असंतोष निर्माण करणार्या घटनांवर उपाय म्हणून एका कठोर कारवाई करण्यात यावी. सर्वाेच्च न्यायालयाने ‘आदिपुरुष’ आणि अशा प्रकारच्या चित्रपटांच्या संदर्भात म्हटले होते की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा असते. त्यामुळे अशा नाटकांना सादरीकरण करण्यास नाट्यगृह आणि सभागृह व्यवस्थापकांनी अनुमती देऊ नये. कायद्याचा धाक नसल्याने अनेकजण देवतांचे विडंबन करणारी नाटके मोठ्या प्रमाणात काढली जात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने शासनाकडे केली असल्याचे समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड, राज्य संघटक सुनील घनवट यांनी कळविले आहे.