मुंबईतल्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरू असलेल्या ५८व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटाचे विजेतेपद पुण्याने पटकाविले.
पुण्याच्या अनिल मुंढे याने मुंबईच्या महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे चुरशीच्या लढतीत तीन सेटनंतर पुण्याच्या रहिम खानने मुंबईच्या विकास धरियावर विजय नोंदविला. पुण्याच्या योगेश परदेशी आणि सागर वाघमारे या दुहेरीच्या जोडीने मुंबईच्या संदीप देवरुखकर व फहिम काझी जोडीवर चुरशीचा विजय मिळवत पुण्याला ३-० असे विजेतेपद मिळवून दिले.
पुरुष सांघिक गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरचा संघ वरचढ ठरला. त्यांच्या मंगेश पंडितने ठाण्याच्या महम्मद ओवेस अन्सारीला नमविले. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या सज्जाद शेखने ठाण्याच्या समीर अन्सारीला हरविले. दुहेरीच्या लढतीत विश्वनाथ देवरुखकर व विवेक कांबळे जोडीने ठाण्याच्या दीपक गनिका आणि महेश शेट्ये जोडीला नमवून आपल्या संघाला ३-० असा एकतर्फी विजय मिळवून दिला.