भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली येथे आर्मी वाइव्हज असोसिएशन (AWWA), या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने आयोजित केलेल्या, ‘अस्मिता-इन्स्पिरेशनल स्टोरीज बाय आर्मी वाइव्हज’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना, राष्ट्रपतींनी सर्व भारतीयांच्या वतीने वीर नारींप्रति कृतज्ञता व्यक्त केली. अस्मिता आयकॉन म्हणून सन्मानित झालेल्या ‘वीर नारीं’ची त्यांनी प्रशंसा केली. वीर नारींच्या कल्याणासाठी आर्मी वाइव्हज असोसिएशन (AWWA) करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी AWWA ची देखील प्रशंसा केली.

आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन (आवा), या लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने नवी दिल्ली इथल्या माणेकशॉ सेंटर मध्ये अस्मिता-लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या प्रेरणादायक कहाण्या’ या मालिकेतील दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक आव्हानांवर मात करत, चिकाटी आणि लवचिकतेच्या बळावर विविध क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या वीर पत्नींच्या प्रेरणादायी कथा सांगण्यासाठी या मंचाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ सुदेश धनखड आणि परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी या सन्माननीय अतिथी होत्या. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष अर्चना पांडे कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक होत्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, महिलांचा आत्मसन्मान एखादा समाज आणि देशाची प्रतिष्ठा ठरवतो. काही जुने विचार मागे सोडून नवीन कल्पना अंगीकारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, या जुन्या म्हणीचा उलेख करून त्या म्हणाल्या की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या सोबत एक स्त्री असते, अशी नवी म्हण असायला हवी. त्या म्हणाल्या की, प्रगतीशील विचार अंगीकारल्याने महिलांची ओळख आणि आत्मविश्वास आणखी बळकट होईल.

आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशन ही संघटना भारतीय लष्करामधील कर्मचाऱ्यांच्या पत्नी, मुले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी काम करते. भारतीय लष्कराच्या बळाला आकार देणारा अदृश्य हात, अशी याची यथार्थ ओळख आहे. 23 ऑगस्ट 1966 रोजी या संघटनेची नवी दिल्ली प्रशासन, मंडळ निबंधकांकडे कल्याणकारी संस्था म्हणून अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली होती.

आपल्या स्थापनेपासून आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनची व्याप्ती वाढली आहे. आज देशातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी एक म्हणून ती ओळखली जाते. अनेक संकटांवर मात करत ज्यांनी आपली ओळख मिळवली आहे, आणि आपल्यासारख्या इतरांना प्रेरणा दिली आहे, अशा धाडसी आणि कर्तृत्ववान वीर पत्नींसाठी ‘अस्मिता’ हे एक व्यासपीठ आहे. खडतर आव्हानांवर मात करत, खंबीरपणे ताठ उभ्या राहिलेल्या शूर महिलांच्या संघर्षाला दिलेली ही सलामी आहे.