पावरलूम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची इच्छा राज्य सरकार बाळगून असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं धुळे येथील मारिया हॉलमध्ये यंत्रमाग (लूम) कामगार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात मुस्लिम बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्य सरकारनं टेक्स्टस्टाईलसंदर्भात काही हितकारी निर्णय घेतले आहेत. पण, त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली

नाही. या अंमलबजावणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली असून लवकरच निर्णय घेऊन पुढची पावलं उचलली जातील, असे ते म्हणाले.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल ६० कोटींवरून ५०० कोटींवर नेले. मंडळाला अल्पसंख्याकांच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारनं दिलेत. आम्ही धर्मनिरपेक्षता मानणारे लोक आहोत. आम्ही शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे लोक आहोत. अल्पसंख्याक समाजासाठी दफनभूमीच्या कंपाऊंड वॉलचं काम, लग्न समारंभाच्या हॉलचं काम सरकारनं पूर्ण केलं आहे. आमचे सरकार हे कायमच अल्पसंख्याकांच्या हिताची भूमिका घेत राहील, असेही पवार म्हणाले.