Thursday, November 21, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजबाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी...

बाबा सिद्दीकींच्या हत्त्येप्रकरणी पोलीस अजूनही शक्यतेवरच!

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येला आज १५ दिवस पूर्ण होत असतानाच पोलीस मात्र अद्यापी विविध शक्यतांचीच पडताळणी करत असल्याचे दिसत आहे. वांद्रे खेरवाडी येथे बाबांची हत्त्या झाल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवसापासून पोलीस सर्वत्र ‘सुपारी’चा अँगल सांगत आहेत व पोलिसी सूत्रांच्या हवाल्यानुसार तो छापूनही येत आहे. या सुपारी अँगलचाच आज काहीसा पर्दाफाश करूया.

९०च्या दशकापासून आपण पाहत आलो आहोत की (याआधीही असण्याची शक्यता आहे.) प्रतिस्पर्धी डोक्याच्या वर जाऊ लागला किंवा डोक्यात जाऊ लागला की त्याचा परस्पर काटा काढण्यासाठी ‘सुपारी’ देऊन हत्त्या करण्यात येत असे. मुंबईतील गँगवॉरच्या काळात गिरणी मालकांच्या काही बायकांनीच नवरा बाहेरख्याली असल्याचे सांगून त्याला मारण्याची सुपारी नामचीन गुंडांना दिल्याची माहिती पोलीस दप्तरात मिळेल. थोडक्यात सुपारी देऊन हत्त्या करण्याचे कारण काहीही असू शकते. बाबांच्या केसमध्ये जसा प्रचंड पैसा आहे तसाच झोपडपट्टी पुनर्वसनाचाही मोठा हात असण्याची दाट शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

सिद्दीकी

आता जरा सध्याच्या ‘सुपारी’ बाजाराबाबत! सुपारी देण्याबाबत मनात विचार आला की निष्णात गुंड टोळी कुणाची / सध्या कुणाचा बोलबाला चालू आहे, अशा सर्वगुणसंपन्न भाई अथवा भायची निवड केली जाते. त्याच्याकडे किमान दोन-तीन शार्प शूटर्ससह किमान १५/२० जणांची तगडी फौज आहे की नाही याची खतरजमा केली जाते. या खातरजमेसाठी तीन-चार प्रकारे चाचपणी केली जाते. माणसे मिळाली की एक निष्णात ‘काळाकोट’ व एक यथायथाच ‘काळाकोट’ शोधला जातो. कारण हुशार काळाकोट किल्ला कोर्टात क्वचितच जात असतो व तसेही खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्यांना न्यायालयीन कोठडीच मिळायला महिना लागतो. (काही केसेसमध्ये अधिक काळही जातो.)

तर आपण गुंडाच्या फौजेपर्यंत आलो होतो. काही गुंडाना रेकी व फक्त झारी मारण्याचे काम दिले जाते. त्यांनी दुसरे काहीच करायचं नसत. दरम्यान प्रमुख गुंड व त्याचे सहकारी ज्याचा गेम करायचा आहे तो कोणत्या पोलीसठाण्याच्या हद्दीत राहतो, त्याचा गुन्हे शोधणारा ज्येष्ठ निरीक्षक कोण आहे, उपायुक्त कोण याची बारीकसारीक माहिती काढली जाते. मुख्य गोष्ट पुढेच आहे मग हळूहळू फिल्डिंग लावली जाते. समोरची व्यक्ती जर तगडी असेल तर फिल्डिंगही तगडी लावली जाते व या कामासाठी ‘प्रभावशाली’ राजकीय नेत्यांचीही मदत घेतली जाते. मुख्य म्हणजे ‘भाय’ कायपण असे सांगून प्रभावशाली त्याला फुटवतो. (तुम्हाला हे सर्व वर्णन चित्रपटातील वाटेल, पण हेही प्रत्यक्षात घडते.) हे सर्व होत असताना ज्याने सुपारी दिली आहे त्याच्याकडून लक्ष्मीदर्शनाच्या मोठ्या पेट्या येतात. सर्वांची खातीरदारी केली जाते. या खातीरदारीतूनच पोलीसठाण्याच्या काही कच्च्या दुव्यांना दाणापाणी दिले जाते.

सिद्दीकी

इतके सर्व होईपर्यंत सावजाची रोजनीशी मिळवली जाते. त्यानुसार रेकीही होते. यात चूक झाली की चूक करणाऱ्याची कानशिले शेकवली जातात. आणि अखेर हा दिवस येतो. सर्वजण आपापल्या ठिकाणी फिट होतात. फोनाफोनी होते.. सावज टप्प्यात येते.. आजूबाजूला हल्लेखोरांच्या सुसाट बाईकस असतात. झाले.. सावज अलगद टप्प्यात येते. ट्रिगर दाबला जातो. गेम झालेला असतो. एकच गदारोळ होतो. लोकांची पांगापांग होते. आणि बाईक्स सुसाट वेगाने गायबच होतात. त्या गदारोळात जनतेच्या हाती त्या १५/२० जणांपैकी एक दोघे लागतात. हा भायचाच प्लॅन असतो.

कोट्यवधी रुपयांच्या सुपारीतील अर्धी रक्कम वाटण्यात जाते. यातही एक गमंत असते. हल्लेखोर स्वतःहून हजर झाले व हल्ल्यानंतर आठ-दहा दिवसांत मिळाले तर पोलीस वा तपास अधिकारी तुलनेने सॉफ्ट वागतात. तोपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळण्याची वेळ येते. वर व्यक्त केलेला हुशार काळाकोट उच्च न्यायालयात एक-दोनदा जामीनअर्ज घेऊन गेलेले असतात. पोलीस कोठडीत मारहाण न करण्यापासून तो मोबाईलची सुविधा, एक-दोन दिवसात छातीत दुखू लागते, मग सरकारी रुग्णालयाची वारी.. डॉक्टरांची मनधरणी अखेर काही दिवस रुग्णालयात वस्ती. तोपर्यंत तपास सुरूच असतो. दोन-तीन महिन्यानंतर संशयितांना जामीनही मिळतो तोपर्यंत मुख्य आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पार पळालेला असतो.

सिद्दीकी

याचेच एक उदाहरण गेल्याच आठवड्यात मुंबईत घडले. चेंबूरच्या हॉटेल मालकाच्या हत्त्येप्रकरणी गुंड छोटा राजन याला तब्बल ३२ वर्षांनी जामीन मिळाला. हत्त्येला नऊ-दहा महिने झाले वा अगदी वर्ष झाले की पोलीसही तपास करणे सोडून देतात. नशिबाने छोटा राजनसारखा कुणी शरण आला तर केस पुन्हा ओपन होते, तरी जामीन मिळतोच लगेच! आता समजा सुपारी दहा कोटी रुपयांची आहे तर त्यातील दोन-तीन कोटी रुपये वाटण्यात व वकिलांच्या फीमध्ये जातात. उरलेले त्या भायला मिळतात. इतकेच नव्हे तर भायपण यानंतर आपला भाव वाढवतो. हे सविस्तर इतक्यासाठीच सांगितले की, सुपारीची क्रिया-दशक्रिया कशी होत असते हे सर्वसामान्यांना समजावे.

बाबांच्या हत्त्येप्रकरणी तर दुसऱ्या दिवसापासूनच पोलीस सुपारी सुपारी म्हणून खेळत आहेत. बाबा सिद्दीकी वांद्रे (पश्चिम / पूर्व ) येथील तगडे राजकीय नेते होते. भाजपचे मुंबई अध्यक्ष व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आशिष शेलार त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अधिक सांगू शकतील असे वाटते. पश्चिम वांद्र्यात बाबा राहत होते तिथे गगनचुंबी इमारत कशी उभी राहिली याचीच जरी पोलिसांनी कसून चौकशी केली तरी या हत्त्येवर प्रकाश पडू शकेल. काही काळ ते कुविख्यात दाऊद गँगशी संबंधित होते. परंतु त्यांचा रुतबा जसा वाढू लागला तसे त्यांनी त्यातून आपले अंग काढून घेतले होते, याचा रागही दाऊदला होता.

दरम्यान, पोलिसांनी या हत्त्येप्रकरणी आतापर्यंत १० संशयितांना पकडले असून अजूनही काहीजण जाळ्यात येतील असा पोलिसांचा भरवसा आहे. त्यातील काहीजण अंबरनाथ, कर्जत वगैरे भागात भाड्याने राहत होते असे पोलिसांनीच सांगितले आहे. तर या सर्व मंडळीचे राहण्यापूर्वी संबंधित मालकांनी पोलीस तपासणी केली होती का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व संशयितांना वेगवेगळे ठेवण्यात येत असून चौकशीसाठी वा न्यायालयात नेताना अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो असे समजते. हे सर्व अट्टल गुन्हेगार असून ते दगाफटका करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधिक दक्षता राखत आहेत, असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Continue reading

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....

बाबा सिद्दीकी हत्त्या प्रकरणात पोलिसांचे घूमजाव?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्त्येस एक महिना पूर्ण होत असताना पोलिसांनी अचानक घुमजाव केल्याचे दिसतंय! कालच पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, "सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी पकडलेल्या संशयिताच्या...

बाबा सिद्दीकींची हत्त्या नेमकी झाली तरी कशासाठी?

गेल्या शनिवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची वांद्र्याच्या खेरनगर परिसरात रात्री हत्त्या करण्यात आली. दुर्दैवी हत्त्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. पोलिसांनी काही संशयितांना पकडले असले तरी पोलिसी सूत्रांनुसार जे चित्र जनतेपुढे आले आहे ते मात्र पूर्ण निराशाजनक आहे,...
Skip to content