बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांची आप्त मंडळी पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा पॅकबंद व सहजपणे उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करतात. बाटलीतले पाणी संपल्यानंतर त्या बाटल्या कचऱ्यामध्ये जातात. मात्र या बाटल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांमुळे कचऱ्यामध्ये मोठी जागा या बाटल्यांनी व्यापलेली असते. तसेच यामुळे कचऱ्याचे विलगीकरण करणेदेखील तुलनेने कठीण होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शीव येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात (सायन हॉस्पिटल) प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हे मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. वापरलेली पाण्याची रिकामी बाटली या यंत्रामध्ये टाकताच तिचा अक्षरशः चिमूटभर भुगा होणार आहे. ज्यामुळे एकंदरीत कचऱ्यामधली बाटल्यांची संख्या कमी झाल्याने त्या कचऱ्याचे विलगीकरण व व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या बाटल्यांचा मशीनद्वारे करण्यात आलेल्या भुग्याचा वापर हा पुनर्चक्रीकरणासाठी होणार असल्याने ते पर्यावरणपूरकदेखील ठरणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. जोशी यांनी सांगितले की, रुग्णालयात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अनेकदा रुग्ण व त्यांच्यासोबत असलेली आप्त मंडळी बाटलीबंद पाणी पिण्यास प्राधान्य देतात. यामुळे रुग्णालयातील एकंदरीत कचऱ्यामध्ये या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे प्रमाण लक्षणीय असते. या बाटल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्या कचऱ्यामध्ये मोठी जागा व्यापतात. हे टाळण्यासाठी आणि अधिक चांगले कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी रुग्णालयामध्ये प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांद्वारे दररोज गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या आता वेगळ्या करण्यात येत असून यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच शीतपेयांसारख्या अन्य प्लास्टिक बाटल्यांचाही समावेश असणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करत असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन बसविण्यात आल्यामुळे कचरा हाताळणी आणि त्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणे आता अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर अधिक कार्यक्षम कचरा पुनर्वापरात योगदान देण्यास आणि प्लास्टिक कचऱ्याचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठीही हे यंत्र प्रभावी ठरणार आहे. भुगा केलेल्या कचऱ्याचा पुनर्वापर करून त्यापासून फॅब्रिक्स, टोप्या, शूज, फोम, रिफ्लेक्टर जॅकेट, मोल्डेड फर्निचर आदी तयार करणेही शक्य होणार आहे, अशी माहितीही डॉ. जोशी यांनी दिली.