Homeकल्चर +रसिकांनी अनुभवला संगीत...

रसिकांनी अनुभवला संगीत रंगभूमीचा वैभवशाली कालखंड

संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव. आणि तिचा वैभवशाली कालखंड रसिकांना अनुभवण्यास मिळाला तो मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत नाट्य महोत्सवातून. संगीत शारदा, संगीत स्वयंवर आणि संगीत मदनाची मंजिरी, या तिन्ही संगीत नाटकांना प्रेक्षकांची एकच गर्दी अनुभवण्यास मिळाली. संगीत नाटकांना परत चांगले दिवस यावेत यासाठी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र ही संस्था गेली १५ वर्षे तीन संगीत नाटकांचा महोत्सव दरवर्षी साजरा करत आहे. यंदाच्या महोत्सवाला विमल ट्रस्ट, दिलीप काटदरे आणि अॅड. संजीव सावंत यांचे आर्थिक सहाय्य लाभले होते.

संगीत

गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘संगीत शारदा’ हे नाटक पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर, या संस्थेने सादर केले. हे नाटक त्या काळातील जरठ-बाल विवाहाच्या अनिष्ट प्रथेवर कोरडे ओढणारे आहे. ‘स्त्री मुक्ती’ हा शब्दही जेव्हा अस्तित्त्वात नव्हता अशा काळात ‘शारदा’मधील स्त्री पात्र स्त्री शक्तीचा एल्गार व्यक्त करतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांची कशी फरफट होते याचं दर्शन यात घडतं. अव्यक्त प्रेम, गैरठिकाणची निष्ठा, समवयस्कांमधला मैत्रभाव, सज्जनांची कुचंबणा यात अनुभवण्यास मिळाली. ओघवती भाषा, गमतीदार व गंभीर यांची गोफस स्वाभाविकता, स्वभावचित्रण आणि पात्रभाषा यादृष्टीने हे नाटक विशेष रंगले.

कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित पुणे येथील कलाद्वयी संस्थेने सादर केलेले “संगीत स्वयंवर’ हे मूळ बालगंधर्व यांचे नाटक म्हणून ओळखले जाते. संगीत मराठी रंगभूमीवरचे सर्वात श्रीमंत नाटक आहे. अभिजात भारतीय संगीत घराघरात पोहोचवण्याचं श्रेय या नाटकाकडे जाते.  “नाथ हा माझा, मोही मना’, “मम आत्मा गमला, एकला नयनाला’, “मम कृष्ण सखा रमा’ ही पदं रसिकांच्या मनाचा ठाव घेत होती. त्याला वन्स मोअर मिळत होता. सर्व पदांना पं. भास्करबुवा बखले यांनी चाली दिल्या होत्या. त्यांनी  वेगवेगळ्या रागातल्या बंदिशींचा उपयोग करून चाली बांधल्या होत्या. त्या सगळ्या चाली रसिकांना मान डोलायला लावणाऱ्या आहेत. त्याचा प्रत्यय या नाटकाच्या सादरीकरणातून आला.

संगीत

पुणे येथील कलाद्वयी या संस्थेतर्फे कै. विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ने महोत्सवाचा समारोप झाला. कै. विद्याधर गोखले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांचे नाटक सादर करून संस्थेने त्यांना स्मरणांजली वाहिली. नाविन्यपूर्ण आणि भावपूर्ण चालींचा साज असलेले ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘मानिनी सोड तुझा अभिमान’ अशी एकाहून एक सरस नाट्यपदे. गझल गायकीच्या अंगाने सादर केलेले ‘ये मौसम है रंगीन’मुळे ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाला रसिकांनी उस्फूर्त टाळ्यांची दाद दिली. ज्या काळात संगीत नाटकाविषयीची रुची कमी होऊ लागली होती त्या काळात विद्याधर गोखले यांनी पौराणिक, सामाजिक, मध्ययुगीन कालखंडावर आधारित लिहिलेल्या नाटकांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा संगीत रंगभूमीकडे वळू लागले. ‘मदनाची मंजिरी’ हे भक्ती, हास्य आणि श्रृंगाररसाने नटलेले नाट्य आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content