बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्या, गुरूवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२३) आणि शुक्रवारी (दि. ६ ऑक्टोबर २०२३) महापालिका मुख्यालयात ‘पेन्शन अदालत’चे आयोजन केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या समिती सभागृह क्रमांक १ मध्ये गुरूवारी दुपारी दोन वाजता पेन्शन अदालतीस सुरूवात केली जाईल. बृहन्मुंबई महापालिकेचे संबंधित विभागांचे अधिकारी या पेन्शन अदालतमध्ये उपस्थित राहणार आहेत. यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा तक्रारकर्त्याशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा पेन्शन अदालतीस सुरूवात होईल. तक्रारकर्त्यांनी पेन्शन अदालतीत सहभागी होताना अदालतीच्या अनुषंगाने कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.