डोळ्यांमधले आसू पुसती, ओठांवरले गाणे। दो नैनोंमें आँसू भरे हैं। नैनोंमें सपना.. अशी असंख्य गाणी मराठी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. गुजरातीमध्ये तर ‘नजर ना जाम छलकावीने चाल्या क्यां तमे?’ असे विचारणा करणारे गीत गुणगुणतानाही पाहायला मिळते. डोळे, नयन, नेत्र अशी असंख्य नावे आपल्या डोळ्यांची घेण्यात येतात. आज ज्येष्ठ सहकारी अनिल जोशी यांची प्रकर्षाने आठवण येते. ते आपल्या लेखांमधून अशा विविध गीतांची गुंफण करुन लेख फुलवताना पाहिले आहे. १९७५ साली मी अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे / शांताराम नाईक चाळीत वास्तव्यास असताना माझे एक पेमगिरीकर मित्र सुभाष डुबे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. कल्याण येथील डोळ्यांच्या दवाखान्यात ही शस्त्रक्रिया सुभाष नानांनी केली. त्यावेळी पंधरा मिनिटे, अर्ध्या तासात उरकणारी आणि झटपट घरी जायला परवानगी देणारी असा वैद्यकीय उपचार नव्हता. इस्पितळात राहवे लागत असे. मी नानांबरोबर त्या इस्पितळात मुक्कामाला होतो. तेव्हा सहज नानांच्या लक्षात आले आणि नाना मला म्हणाले, अरे योगेश, तुला डाव्या बाजूला दिसण्यासाठी काही अडचण आहे का? मी तेव्हा वीस वर्षांचा होतो. मला दिसत होते. पण डाव्या बाजूला दिसत नाही हे कधी जाणवले नाही.
मी नानांच्या सल्ल्यानुसार त्याच दवाखान्यात डोळे तपासले तर उजव्या डोळ्याने सुस्पष्ट दिसत होते. पण डाव्या डोळ्याला ‘वजा बारा’ या क्रमांकाचा चष्मा लिहून दिला. मुंबईतील हुतात्मा चौकात बालीवाला अँड होमी या चष्म्याच्या दुकानातून चष्मा घेतला. जेव्हा चष्मा घेतला त्याचक्षणी तो दुकानदारासमोर भिरकावला. व्यापारी, दुकानदार यांना या सर्वांची जाणीव असते. त्यांनी मला विचारले की, पहिल्यांदाच चष्मा घेताय ना? काही हरकत नाही. चष्मा सतत वापरा. आठ दिवसांनी पुन्हा या. तुम्ही चष्मा काढणारच नाही. त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले आणि तसेच झाले. दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे निघून गेली. मी अंबरनाथहून बोरीवली येथे राहायला आलो. २०१७ साली माझ्या चिरंजीवांचा विवाह झाला आणि सून घरात आली. या दोघांनी आम्हा दोघा पती-पत्नीकडे सर्वार्थाने लक्ष पुरविण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून २०१८ साली मला बोरीवली पश्चिम येथे प्रख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. सलील अगरवाला यांच्या दवाखान्यात नेले. माझे डोळे पुनश्च तपासून बदललेल्या क्रमांकाचा चष्मा घेऊन दिला. त्याचवेळी डॉ. सलील अगरवाला यांनी माझ्या उजव्या डोळ्यात मोतीबिंदू वाढत असल्याची जाणीव करून दिली. दोन वर्षे गेली. कोरोनाने संपूर्ण विश्वात थैमान घातले. महाराष्ट्रात टाळेबंदी सुरू झाली आणि आमच्या फिरण्यालाही ‘टाळे’ लागले.

फेब्रुवारी २०२०च्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘उद्यापासून सर्वत्र बंद’ ही घोषणा केली आणि मी विधानभवनातून घरी आलो. त्यानंतर घरात लिखाणाचे आणि अन्य इतके काम वाढले की वेळ अपूर्ण पडू लागला. सकाळी सुमारे एक तास तर घरोघरी वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाचे काम मी करीत होतो. एक वेगळाच आनंद, निराळे समाधान या कामात मिळत होते. टाळेबंदीच्या काळात वर्तमानपत्र आणि त्याचे महत्त्व अधोरेखित झाले. मोठमोठाल्या व्यक्ती असोत की माझ्या महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ येथील वर्गमित्र, मैत्रिणी असोत, आवर्जून हे वर्तमानपत्र पाठवा, असे सांगू लागली. व्हॉट्स एपवर मी वर्तमानपत्रे पाठवतच होतो. याच दरम्यान माझे अनेक मित्र वा त्यांचे नातेवाईक काळाच्या पडद्याआड गेले. काहींच्या नोकऱ्या गेल्या. मनाला वेदना देणाऱ्या असंख्य घटना घडल्या. याच वेळी माझ्या उजव्या डोळ्याने दिसणे कमी होत आहे, असे जाणवू लागले. २४ सप्टेंबरला मित्र भारत कदम यांचा वाढदिवस होता आणि पन्नास वर्षांचे सोबती विजय वैद्य श्रमिक एकजूटच्या अंकातील माझ्या लेखाची प्रत घेऊन आले. मी कुसुमभारती इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभा होतो आणि मला माझ्या भ्रमणध्वनीवर काहीही दिसत नव्हते. कशीबशी वेळ मारुन नेली आणि घरी येऊन पत्नीला म्हणालो, मला डोळ्याच्या दवाखान्यात जावे लागेल.
घरच्यांनी धावपळ केली आणि मला डॉ. अगरवाला यांच्यासमोर नेऊन उभे केले. त्यांनी तपासून वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगितले. त्या झाल्या आणि २४ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी डॉ. अगरवाला यांनी उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढून टाकला. सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा या काळात मला उपयोगी आले. योगायोग म्हणजे माझे पत्रकारितेतील जुने सहकारी संजय डहाळे यांनासुद्धा मोतीबिंदूचा त्रास होत असल्याचे जाणवले. त्यांनी श्रीकांत देशमुख यांच्या चष्म्याच्या दुकानात धाव घेतली. तिथे माझा विषय निघाला. चर्चा झाली. त्यांनीसुद्धा डॉ. अगरवाला यांच्याकडे डोळ्यांची तपासणी केली. वैद्यकीय चाचण्या केल्या. तोवर मी उजव्या डोळ्याची तपासणी करायला गेलो. तेव्हा डॉ. अगरवाला यांनी डाव्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. ५ नोव्हेंबर २०२० ही शस्त्रक्रिया करण्याची तारीख ठरली. संजय डहाळे यांचीसुद्धा योगायोगाने तीच तारीख निश्चित झाली. त्याचदिवशी मी आणि डहाळे, दोघांच्याही डाव्या डोळ्यांवर अर्ध्या तासाच्या अंतराने यशस्वी शस्त्रक्रिया झाली. मी आणि डहाळे डॉ. अगरवाला यांच्याकडे महिनाभर तपासणी आणि चष्मा यासाठी जात होतो. या काळात एक महिना वर्तमानपत्र, दूरदर्शन आणि भ्रमणध्वनी माझ्या पासून दूर ठेवण्यात आले होते. मुलाने एक उपकरण उपलब्ध करुन दिले. या उपकरणाद्वारे बंद डोळे आणि उघडे कान, बिछान्यावर पडल्यापडल्या पुस्तके ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली. पु. ल. देशपांडे यांची बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात, प्रदीप दळवी यांचे मी नथुराम गोडसे, गजानन महाराज, स्वामी समर्थ, स्वामी विवेकानंद, साईबाबा, बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, शिवाजी सावंत यांचे युगंधर, मृत्युंजय ही पुस्तके ऐकून माझ्या बुद्धिमत्तेच्या भांडारात भर घालण्याचा प्रयत्न केला. माझ्या लिखाणाला सुरुवात करण्यासाठी डॉ. अगरवाला यांनी अनुमती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब : माझी जबाबदारी’ हे सूत्र सांगितले. त्यात थोडा बदल करुन मी म्हणतो की , ‘माझ्या कुटुंबाच्या हाती, माझी जबाबदारी!’.. खरंय ना? कारण आज मी जो उभा आहे तो निव्वळ माझ्या कुटुंबामुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य सहकाऱ्यांमुळेच. हे सारे पाहिले तर ‘नयनांमधले मोती’ काय आहेत आणि श्रीमंती काय आहे याचा यथार्थ प्रत्यय येतो. सर्वांना माझा साष्टांग प्रणिपात!
(लेखकाचा दूरध्वनी- 9892935321)


खूप छान लेख आहे. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती मोठी असते आणि ती त्रिवेदी कुटुंबाची आहे.