शर्वी सावेच्या ६० चेंडूंतील १०२ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनने (पीडीटीएसए) मुंबईच्या शिवाजी पार्कवरील प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत फोर्ट यंगस्टर्सचा १५ चेंडू आणि ७ विकेटनी सहज विजय मिळविला. तसेच रिगल, व्हिक्टरी आणि भारत या क्रिकेट क्लबनेही दणदणीत विजयासह स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने माहिम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महिला क्रिकेटपटूंची फटकेबाजी पाहायला मिळाली. पालघर डहाणू तालुक्याच्या शर्वी सावेने फोर्ट यंगस्टर्सच्या गोलंदाजांना फोडून काढताना १५ चौकारांची बरसात करत ६० चेंडूंत १०२ धावा काढल्या. फोर्ट यंगस्टर्सच्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शर्वीने अश्विनी निशादसह चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची अभेद्य भागी रचत संघाला १८व्या षटकांतच विजय मिळवून दिला.
दुसर्या एका सामन्यात केतकी धुरेच्या ३७ चेंडूतील ६५ धावांच्या नाबाद खेळीमुळे भारत क्रिकेट क्लबने ४ बाद १३७ अशी मजल मारली होती तर अक्षी गुरवच्या ९ धावांत टिपलेल्या ३ विकेटमुळे माटुंगा जिमखान्याचा डाव अवघ्या ४० धावांतच आटोपला आणि भारतने ९७ धावांचा मोठा विजय मिळविला. त्याचप्रमाणे सारिका कोळीच्या ८६ आणि मानसी तिवारीच्या ६९ धावांमुळे व्हिक्टरी क्लबने ६ बाद २०२ असा धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल बोरीवली क्रिकेट क्लबचा संघ अलीशा खानच्या मार्यापुढे ७१ धावांतच कोसळला आणि व्हिक्टरीने १३१ धावांच्या दिमाखदार विजयाची नोंद केली. रिगल क्रिकेट क्लबनेही महाराष्ट्र यंग क्रिकेटर्सचे ९४ धावांचे माफक लक्ष्य १४.१ षटकांत३ फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.
संक्षिप्त धावफलक
फोर्ट यंगस्टर्स: २० षटकात ५ बाद १४४ (जान्हवी काटे ३२, सन्मया उपाध्याय ३२, जयश्री भुतिया ना. २३; वैष्णवी घरत २४/२, रागिणी दुबला १२/१).
पीडीटीएसए: १७.३ षटकात ३ बाद १४६ (शर्वी सावे ना.१०२, अश्विनी निशाद ना. २३; झिल डिमेलो २६/१, हिया पंडित २३/१).
महाराष्ट्र यंग क्रिकेटर्स: १९.३ षटकात सर्वबाद ९३ (हीर कोठारी ३०; चेतन बिश्त १०/३, कोमल जाधव २७/२, नितील नेगी १४/३).
रिगल क्रिकेट क्लब: १४.३ षटकात ३ बाद ९४ ( सृष्टी नाईक २०, सुषमा पाटील ना. २९, हर्षल जाधव १९ ; आर्ची यादव १८/१)
व्हिक्टरी क्रिकेट क्लब: २० षटकात ६ बाद २०२ (सारिका कोळी ८६, मानसी तिवारी ६९ ; साची लोंढे ३३/२, पूजा तांजणे २६/१).
बोरीवली क्रिकेट क्लब: २० षटकात ७ बाद ७१ (पूजा तांजणे १४; अलीना खान ७/३, नियती जगताप १५/१)
भारत क्रिकेट क्लब: २० षटकात ४ बाद १३७ (केतकी धुरे ना. ६५, लक्ष्मी सरोज २३, निर्मिती राणे १९ ; दिया चलवाड २४/२).
माटुंगा जिमखाना: १२ षटकात सर्वबाद ४० (गार्गी बांदेकर ; अक्षी गुरव ९/३, कशीश निर्मल १/३, प्रणाली कदम ९/२, निर्मिती राणे ५/३).