बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे (Water Bills) अधिदान हे जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक असून एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ गेल्या वर्षी, २०२०मध्ये सुरू करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२० ही या योजनेची अंतिम तारीख होती. मात्र, या योजनेला प्राप्त होत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेत, आता या योजनेला येत्या नवीन वर्षात ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे आपल्या क्षेत्रातील सव्वा कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरविणारी महानगरपालिका, असा लौकिक असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, यासाठी महापालिका नियमित प्रयत्नशील असते.
एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. देयकाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला २ टक्के यानुसार ही आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना सुरू करण्यात आली आहे.
सर्व जल-जोडणी ग्राहकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या प्रलंबित जल देयकातील (Outstanding Water Bill) जलआकार, मलनिःसारण आकार आणि जलमापक भाडे यांचे एकरकमी अधिदान (Payment) करुन तसेच अभय योजनेच्या कालावधीत निर्गमित झालेल्या सर्व जल देयकांचे अधिदान ३१ मार्च २०२१ पूर्वी करुन या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (जलकामे) (Assistant Engieer, Water Works) यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीतजास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

