Wednesday, October 16, 2024
Homeएनसर्कलपातंजलयोगदर्शन आणि निरंतर...

पातंजलयोगदर्शन आणि निरंतर साधना!

पातंजलयोगदर्शन – निरंतर साधना, हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. काय आहे या पुस्तकात? इ.स. अकराव्या शतकात होऊन गेलेल्या राजा भर्तृहरी यांचे ऋषी पतंजलींविषयी दोन ओळींचे एक स्तोत्र आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचां। मलं शरीरस्य च वैद्यकेन।

योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां। पतंजलीं प्रांजलिरानतोऽस्मि।।

योगाने चित्ताचा, व्याकरणाने भाषेचा आणि वैद्यकाने शरीराचा मळ ज्यांनी दूर केला त्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना मी दोन हात जोडून नमस्कार करतो.

हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचे आधारभूत ग्रंथ म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे चार वेद, सुमारे एकशेऐंशी उपनिषदे, त्यातील महत्त्वाची तेरा उपनिषदे म्हणजे ईश, केन, कंठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैतरीय, ऐतरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, श्वेताश्वतर, मैत्रेयणी व कौशितकी ही सांगता येतील. या उपनिषदांमध्ये सर्व उपनिषदांचे सार आले आहे. याबरोबरच सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, मीमांसा (पूर्वमीमांसा), वेदान्त (उत्तरमीमांसा) ही षटदर्शने, रामायण, महाभारत यामध्येही हिंदू धर्म तत्त्वज्ञान आलेले आहे. षटदर्शनांपैकी ‘योगदर्शन’ हे महत्त्वाचे दर्शन आहे. योगाचा उल्लेख नेहमी सांख्यदर्शनाच्या जोडीने केला जातो. कारण त्या दोहोंच्या सिद्धांतात पुष्कळच साम्य आहे. सांख्यदर्शन पंचवीस तत्त्वे मानते. योगालाही ही तत्त्वे मान्य आहेत. फक्त सांख्यदर्शनाला मान्य नसलेले ईश्वर नावाचे सव्वीसावे तत्त्व योगदर्शनाने स्वीकारले आहे.

योगाचे मूळ ज्ञान हिरण्यगर्भापासून म्हणजे ब्रह्मदेवापासून आलेले असल्याचे योगपरंपरा सांगते. श्रीविष्णू आणि श्रीशिव यांच्यापासून योगशास्त्र आलेले आहे असाही विचार योगपरंपरेत आलेला आहे. योगविद्या ही अनुभवसिद्ध अशी विद्या आहे. ती भारतीयांची सर्वात प्राचीन आध्यात्मिक संपत्ती आहे. ऋग्वेदात १.६४-३१ ऐतरेयआरण्यकात बृहदारण्यक, श्वेताश्वतर कठोपनिषद, अमृतनादोपनिषद यामध्ये योगतत्त्वज्ञानाचे व योगसाधनेचे वर्णन आले आहे. श्रीमद्भगवद्‌गीता हे परम आणि परिपूर्ण असे योगशास्त्र आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेत/शेवट ‘योगशास्त्रे’ असा निर्देश येतो. श्रीकृष्णालाही योगेश्वर असेच म्हटले आहे.

बौद्ध धर्मात योगाचे महत्त्व मान्य केलेले असून बुद्धाच्या जन्मकाळी भारतात योगविद्या प्रतिष्ठित झाली होती. बुद्धाच्या अनेक शिष्यांनी साधना करून अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. योगाचे चार प्रकार आहेत. मंत्रयोग, हठयोग, लययोग व राजयोग. मंत्रयोगामध्ये मंत्रातील मूळ शक्ती प्रकाशात आणणे हा उद्देश असतो. हठयोगामध्ये देहशुद्धी हे उद्दिष्ट असते. लययोगामध्ये मानवपिंड ही ब्रह्माण्डाची प्रतिकृती मानली जाते. तर राजयोगामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार संचालित अंतःकरणच जीवाला बंधनाला कारण होते.

या चारही योगात ‘राजयोग’ हा सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. राजयोगावर पतंजलीची योगसूत्रे प्रसिद्ध असून ती प्रमाणभूत मानलेली आहेत. त्यांना ‘पातंजल योगसूत्रे’ असे म्हणतात. मात्र पतंजली ऋषी हे योगाचे प्रणेता नव्हेत. ते त्याला व्यवस्थित आकार देणारे सूत्रकार होत. इतर सर्व दर्शनांचे दर्शनकार हे त्या त्या दर्शनाचे व्यवस्थापकच आहेत.

या पुस्तकाबद्दल लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे लिहितात की, उपनिषदांच्या काळापासूनच भारतीय तत्त्वचिंतकानी मानवी अस्तित्त्वाचा अर्थ शोधण्याचा गंभीर प्रयत्न सातत्याने केला आहे. भौतिक जगापलीकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्त्वापर्यंत मानवी अस्तित्त्व पोहोचू शकते का? विस्तारू शकते का, याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना! याची जाणीव झाल्यावर भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचा फार मोठा भाग योगसाधनेच्या अनेक मौलिक प्रणालींनी व्यापला आहे.

पातंजल महाभाष्याबरोबरच योगसूत्रांचेही कर्तृत्त्व ज्यांच्याकडे जाते ते पतंजली इसवीसनापूर्वी सुमारे दीडशे वर्षे होऊन गेलेले महापंडित. त्यांचे योगदर्शन म्हणजे भारतीय योगविषयक तत्त्वचिंतनाचा सर्वमान्य आणि सर्वाधिक प्रमाण मानला गेलेला ग्रंथ आहे. पूर्वाभ्यासांच्या आधारे या योगसूत्रांचे साधे आणि आकलनसुलभ असे विवेचन इथे केले आहे. साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या सर्वांना योगशास्त्राची ओळख करून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे असे लक्षात येते. एक महत्त्वाचा योगविषयक ग्रंथ सर्वसामान्यांच्या आकलन कक्षेत यावा ही या पुस्तकामागची प्रेरणा अभिनंदनीय आहे.

पातंजलयोगदर्शन – निरंतर साधना

लेखिका: डॉ. धनश्री धनंजय साने

प्रकाशक: ग्रंथाली

पृष्ठे: ३४०

मूल्य: ५००/- रुपये (कुरिअर खर्चासहित)

पातंजल

पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

जाणून घ्या इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा!

इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक  आर्ट पेपरवर छापलेले आहे. लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहोत. 'चंद्रयान-३'चे यश अतिशय गौरवास्पद होते आहे. याची...

वाचा एका सामान्य शिक्षिकेचे शाळेतले प्रयोग!

'माझे शाळेतले प्रयोग' हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका सामान्य शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवासवर्णन आहे. या पुस्तकाच्या लेखिका स्मिता गौड यांनी जिल्हा परिषद शाळेत २४ वर्षे अध्यापनकार्य केले.‌ त्यानंतर त्या प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर रुजू झाल्या. त्यांचा हा प्रवास...

इतिहास पुसून टाकता येत नाही, फक्त विसरता येतो!

इतिहास पुसून टाकता येत नाही, बदलताही येत नाही, मात्र... इतिहास विसरता येतो! हाच विसरलेला इतिहास सांगण्याचे काम बाबू गंजेवार यांनी केला आहे. कोणता इतिहास आपण विसरलो? तो इतिहास आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा! भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक लखलखते पर्व म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम। बघता...
Skip to content