गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींचे आगमन, गणेशमूर्तींचे विसर्जन, गौरी-गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदूर्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वजनांच्या वाहनांना पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणवकली, कुडाळ, सावंतवाडीदरम्यान बंदी असणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 16 सप्टेंबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून 20 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे.
त्यानंतर 5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी-गणपती विसर्जन, परतीच्या प्रवासासाठी 23 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 25 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन, परतीच्या प्रवासाकरीता 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 29 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत जड वाहनांना वाहतूकबंदी राहील.
तसेच 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्री ते 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या महामार्गावर बंदी असलेल्या कालावधीव्यतिरिक्त उर्वरित कालावधीत अशी वाहने, ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 20 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 23 सप्टेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत या वेळेत वाहतुकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहने 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यानंतर नियमित वाहतूक करतील. निर्बंधबंदी दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66च्या रस्तारूंदीकरण, रस्तादुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने–आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलिसांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड, अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याबाबत प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात–निर्यात मालाची वाहतूक सुरू राहील, याकरीता वाहतुकीचे नियेाजन करण्यात यावे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

