उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी वायकरांना विजयी जाहीर केले. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत. वायकरांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्याच्या फोनच्या मदतीने ईव्हीएम मशीन हॅक केले. आम्ही वायकरांना लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेऊ देणार नाही. ते शपथ घेतात कशी हे पाहतोच… वगैरे.. वगैरे.. वल्गना गेल्या काही दिवसांपासून काही विशिष्ट मराठी वृत्तवाहिन्यांवर दिवसभर केल्या जात होत्या.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वल्गना करणारे हे नेते आज तोंडावर आपटले. त्यांच्या लोकसभा सदस्यांसमोरच अवघ्या ४८ मतांनी ठाकरे गटाच्याच अमोल कीर्तिकर यांचा पराभव केलेले रविंद्र वायकर यांनी लोकसभा सदस्यत्वाची मराठीत शपथ घेतली. विरोध तर सोडाच या काळात त्यांच्याविरोधात कोणी ब्रदेखील काढला नाही. त्यामुळे ह्यांव करू आणि त्यांव करू म्हणणाऱ्यांच्या स्टेटमेंट्स दिवसभर वाजवणाऱ्या वृत्तवाहिन्याही थंडच पडल्या.
आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शपथ घेताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आपल्या वडिलांना स्मरून शपथ घेतली. मात्र, हंगामी सभापतींनी त्यांची ही शपथ योग्य नसल्याचे सांगत त्यांना पुन्हा सदस्यत्वाची शपथ घेण्यास भाग भाग पाडले.
इंग्रजीत शपथ घेणारे डॉ. नामदेव किरसान यांनी सदस्यत्वाची शपथ घेताना एकच वाक्य दोनवेळा उच्चारले. परिणामी त्यांचीही शपथ अयोग्य ठरवत हंगामी सभापतींनी त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांना इंग्रजी येत नसल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी त्यांची हेटाळणी केली होती. याचा पुरेपूर वचपा काढत आज निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतूनच लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना हातात संविधानाची प्रत नाचवत होते. संविधानाची प्रत हातात धरतच त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी जय हिंद, जय संविधान असा नाराही दिला आणि पुन्हा हात उंचावत सभागृहाला संविधानाची प्रत दाखवली.
एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी उर्दूतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अखेरीस पॅलेस्टाईनच्या जयजयकाराची घोषणा केली. भाजपाच्या नेत्यांनी त्याला जोरदार विरोध केला. ओवैसी यांनी पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी सुरू होईपर्यंत हंगामी सभापतींनी ते शब्द कामकाजातून काढून टाकण्याची घोषणा केली.