Homeहेल्थ इज वेल्थउद्या मुंबईत मिळणार...

उद्या मुंबईत मिळणार फक्त दुसरा डोस!

पुरेसा लससाठा नसल्याने उद्या दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतल्या ७३पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रे बंद राहणार असून उर्वरित ३३ खासगी लसीकरण केंद्रांवरही दुसऱ्या मात्रेसाठी मर्यादित साठाच शिल्लक ठेवण्यात आल्याचे समजते.

आज रात्रीपर्यंत लससाठा उपलब्ध झाला तर उद्या शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे दुसरी मात्रा घेऊ इच्छिणाऱ्यांनीच उद्या दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी लसीकरणासाठी यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

कोविड प्रतिबंध लसीचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा आज (दिनांक २८ एप्रिल २०२१) जवळपास संपुष्टात आला आहे. या कारणाने उद्या गुरुवार, दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतील ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. तर उर्वरित ३३ खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठी उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसऱ्या मात्रेसाठी (डोस) येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.

दरम्यान, आज (दिनांक २८ एप्रिल २०२१) रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा प्राप्त झाल्यास उद्या गुरुवार दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे.

लससाठ्याच्या उपलब्धतेची ही वस्तुस्थिती पाहता, उद्या गुरुवार, दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी दुसरी मात्रा घेण्यास पात्र असणाऱ्यांनीच लसीकरणासाठी यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. लससाठ्याचा ओघ वाढल्यानंतर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल.

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महापालिका, शासन यांच्यातर्फे ६३ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरी मात्रा (डोस) घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेऊन दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

मुंबईतील लसीकरण मोहीम अखंडितपणे सुरु ठेवता यावी, त्यासाठी आवश्यक लससाठा उपलब्ध व्हावा, याकरीता मुंबई महापालिका प्रशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या अनुषंगाने, आज (दिनांक २८ एप्रिल २०२१) रात्री उशिरापर्यंत सरकारकडून काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आज रात्री उशिरापर्यंत लस साठा उपलब्ध झाला तर उद्या (दिनांक २९ एप्रिल २०२१) सकाळी लससाठा वितरण करण्यात येईल. त्यामुळे महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू करण्यास उशीर होऊ शकतो, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबई महापालिकेला दिनांक २५ एप्रिल २०२१पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. त्यापैकी, २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लस साठा आज (दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत) लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता. लसीकरणाचा वेग लक्षात घेता हा लससाठा आजच पूर्णतः उपयोगात येण्याची शक्यता आहे, असेही पालिकेने म्हटले आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content