Homeडेली पल्सफक्त तासभर- नारायण...

फक्त तासभर- नारायण राणे.. धनुष्यबाण.. नारायण राणे.. धनुष्यबाण!

मी ज्या सुभाष नगर परिसरातून नगरसेवक झालो तेथे फक्त 18% मराठी लोक होते. स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन डॉ. मुजुमदार यांच्या विरोधात निवडणूक लढलो. त्यावेळेला मी राणे पॅटर्न तयार केला. वैचारिक प्रचार करून तेथे जिंकणं अशक्य होतं. हण्या परब नावाचा माझा मित्र होता. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री त्याला बोलावले. वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांची एक लिस्ट त्याच्याकडे दिली आणि त्या सर्वांना बोलावून घेतले. वेगवेगळ्या पक्षाचे ते लोक होते. त्यांना फक्त दोन वाक्यं सांगितली. उद्या याच रस्त्यावरून तुम्हाला नोकरी, धंद्याला जायचंय… माझा ऐकले तर चांगले आहे आणि त्यांनी माझं ऐकलं… त्या सगळ्यांना एक एक रिक्षा दिली. 48 रिक्षांमध्ये 48 माणसं फिरत होती. आपापल्या भागामध्ये ते गेले आणि फक्त एवढेच सांगितलं की, धनुष्यबाण.. नारायण राणे.. धनुष्यबाण… नारायण राणे… त्यांना एक तास फिरवले आणि सोडून दिलं. आदल्या दिवसापर्यंत आपापल्या पक्षासाठी प्रचार करणारे हे नेते ऐनवेळी माझा प्रचार कसा करतात म्हणून लोकही हैराण झाले. कालपर्यंत क भूमिका घेतल्यामुळे मला मत द्या सांगणारे हे नेते नंतर घराबाहेरच पडले नाहीत. त्यातच मतदारसंघातला क भाग असा होता की तेथे मराठवाड्यातले दुष्काळग्रस्त आणून ठेवले होते. त्यांना काय हवं, नको ते बघितले. त्यांची एकगठ्ठा मते मिळाली. त्या निवडणुकीत 750 मतांनी मी विजयी झालो. दांडगाई न करता फक्त कौशल्य वापरून आपण ही निवडणूक जिंकली, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

एका वृत्तवाहिनीवरील नारायण राणे आपले चिरंजीव आमदार नितेश राणे तसेच माजी खासदार निलेश राणे यांच्यासह सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली शिवसेना दुसऱ्या स्थानावर होती. त्यावेळेला वैचारिक भाषणांनी प्रभावित करणारे वक्ते होते. आज यांची काय स्थिती आहे? त्यांच्याकडे एक तरी असा नेता आहे का? संजय राऊत आता राजकारणात सुसंस्कृतपणा यावा असे बोलत आहेत. त्यांना तसे बोलावेच लागणार आहे. कारण आता राजकारणात पाय मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे क्रमप्राप्त आहे. लक्ष्मणरेषा त्यांनी स्वतः ओढली आहे. राजकारण संपत असेल तर तरुण पिढी लक्षात ठेवेल असे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, काही त्यांनी सोडले आहे का? फक्त शिव्या घालण्याचे काम केले. यांना शिवसेनेबद्दल काय माहिती नाही. एका मराठी साप्ताहिकात त्यांनी बाळासाहेब तसेच उद्धव यांच्याबद्दल किती घाणेरडे लिहिले आहे हे आम्हाला माहित आहे. त्यावेळेला जी शिवसेना होती ती आज ज्या स्थितीमध्ये त्यांनी नेली याच्यामध्ये यांचा सहभाग मोठा आहे. आणि शिव्या घालण्यासाठी यांना कोणी लायसन्स दिले आहे का? हे कोणाची इज्जत ठेवत नाही, तर यांची इज्जत का ठेवावी, असा सवालही राणे यांनी केला.

आपली दोन्ही मुले राजकारण, शिक्षण आणि व्यवसाय या क्षेत्रात कर्तृत्ववान निघाली. त्यांनी आपली कर्तबदारी सिद्ध केली आहे. व्यवसाय अधिक वाढवावा, राजकारण नंतर करावे यावर आपला कटाक्ष असतो आणि हे दोघेही ओघाओघाने राजकारणात आले. मी राजकारणात यशस्वी झालो. मात्र सध्या राजकारण ज्या पद्धतीने चालू आहे, परस्परांविरुद्ध सुडाची भावना निर्माण करण्यात येत आहे, विश्वाससार्हता हरपली जात आहे, निष्ठा, प्रामाणिकपणा याला स्थान राहिलेले नाही. अशा स्थितीत आपल्या मुलांनी राजकारणात यावे असे मला कधी वाटत नव्हते. परंतु ते राजकारणात आले आणि आता ते ज्या टप्प्यावर आहेत त्याबद्दल आपण समाधानी आहोत. मात्र त्यांनी आणखी वरचे टप्पे गाठावेत, अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे असेही राणे यांनी स्पष्ट केले.

आपण आपले आत्मचरित्र लिहिले. मात्र त्यात बालपणाचा उल्लेख मुद्दाम टाळला. पाचवीत असताना वडील मफतलाल मिलमध्ये होते. आजारी पडले. काम करणं अशक्य झालं. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि भावंडांना घेऊन गावी गेले. आईने मला चेंबूरमध्ये मामाकडे ठेवले. त्यामुळे जसे अपेक्षित लहानपण असते तसे माझे लहानपण गेले नाही. सातवीनंतर आठवीत गेलो. दिवसा नोकरी आणि नाईट स्कूलमध्ये अभ्यास केला. आठवी ते अकरावी या काळात सात नोकऱ्या केल्या. अकरावीनंतर इन्कम टॅक्समध्ये संधी मिळाली. तेथे नोकरी केली. मला क्रिकेट खेळायला आवडायचं. जशी राजकारणामध्ये मी बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतो तसेच मी त्या क्रिकेटमध्येही करत होतो. व्यवसाय करायला मला फार आवडायचे. आजही आवडते. त्यावेळेलाही मी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. गॅरेज होते, फटाक्यांचा धंदा होता. पेपर होते… हॉटेल व्यवसायामध्ये मी आहे. वडिलांना काहीतरी मदत व्हावी म्हणून मी इथून पैसे पाठवायचो. पण वडील व्यवसायातले पैसे घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे मग नोकरीतून मिळणारा पूर्ण पगार मी त्यांना पाठवत होतो. कधीही एका व्यवसायात मी कायम राहिलो नाही. वेगवेगळे व्यवसाय करणं याला मी प्राधान्य दिलं. १९८४ साली नोकरी सोडली आणि महापालिकेची निवडणूक लढवली आणि निवडूनही आलो, असे ते म्हणाले.

आपल्या घरात शिस्तीला फार महत्त्व आहे. ठराविक वेळी सगळेजण एकत्र असतात. एकत्र बसून जेवतात. टेरेसवर रोज एक तास एकमेकांशी बोलतात. कोणीही घराबाहेर असलं तरी त्यांची विचारपूस केली जाते. ही दोन्ही मुलं परदेशी शिकत होती, त्यावेळेलाही कोणाला बरं नसलं तरी रात्रभर जागून त्यांचे बरं आहे की नाही याची खात्री पटल्याशिवाय आम्ही झोपत नसू. मग दुसऱ्या दिवशी महत्त्वाची मीटिंग असू देत किंवा अधिवेशन असू देत. ही मुलं परदेशात जाताना त्यांना दोन-चार गोष्टी सांगितल्या. परदेशात कितीही शिकलात तरी पुन्हा मुंबईतच येऊन व्यवसाय करायचा आहे. तिकडे कोणत्याही परिस्थितीत व्यसन करायचं नाही. सॅटर्डे क्लब करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणीही नातेवाईक किंवा वडीलधारी माणूस समोर दिसला तर त्याला नमस्कार करून आपण आपले संस्कार दाखवायचे, असे सल्ले आम्ही मुलांना दिले आणि आज मला अभिमान आहे की त्यांनी ते पाळले, असेही राणे यांनी सांगितले.

आमच्या कुटुंबाच्या प्रगतीत माझ्या पत्नीचा वाटा फार मोठा आहे. मुलांचे संगोपन, शिक्षण त्यांना काय हवं नको, आजही ती पाहते. यशस्वी कुटूंब पुढे चालवण्याचा वारसा सुनांनीही घेतला आहे. आमच्या घरात 43 वर्षांच्या संसारात कधीही बाचाबाची, वादावादी झाली नाही. आणि त्याबद्दल आम्ही सर्व भाग्यवान आहोत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

वडिलांना मदत करण्यासाठीच राजकारणात – निलेश राणे

मी वडिलांबरोबर ठिकठिकाणी फिरलो आणि त्यांना आपली मदतच होईल असं वाटल्यामुळे त्यांच्याबरोबर राजकारणात आलो. भावालाही त्यादृष्टीने सोबत घेतले, असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहत पाहत लहानाचा मोठा झालो. त्याच्यामुळे आजही माझ्यातला शिवसैनिक गेलेला नाही. त्या तुलनेत नितेश बऱ्यापैकी भाजपात रूळला आहे असेही ते म्हणाले. आम्हाला आमचा व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र अनेकदा आमच्या वडिलांनी आम्हाला वेळोवेळी योग्य ते सल्ले दिले आणि ते व्यवसाय आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने केले, असेही निलेश राणे म्हणाले.

आमदार, खासदाराआधी आम्ही मुले आहोत – नितेश राणे

आमच्यावर कोणी वैयक्तिक पातळीवर टीका करायला लागलं तर शेवटी आम्हीही कोणाची तरी मुले आहोत. आमदार, खासदार ही पदं नंतर आहेत. त्यामुळे आम्ही जशास तसे उत्तर देणारच, असे आमदार नितेश राणे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content