पुन्हा एकदा, “प्यार किया तो..”
गोपीनाथ मुंडेंवर एका विख्यात तमाशा कलावंत बरखा यांच्याशी विवाहबाह्य संबंधांचे आरोप थेट अण्णा हजारेंपासून अनेकांनी केले होते. १९९६-९७मध्ये ते प्रकरण वृत्तपत्रांतूनही पुष्कळ गाजले होते. त्यावेळी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरेंनी मुंडेंना सल्लावजा थेट सवाल केला होता की, “प्यार किया तो डरना क्या?” तोच सल्ला पुतण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देऊ शकतात! त्यावेळी ठाकरेंच्या रिमोट कंट्रोलखालील सरकारमध्ये मुंडे उपमुख्यमंत्री होते. आता दुसऱ्या ठाकरेंचे थेट राज्य आहे आणि पुतणे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. तशी त्यांनी करणे अपेक्षितच असले तरी त्यांनी जे म्हटले आहे तेही अतिशय खरे आहे. राजकारणात एखाद्या नेत्याला राज्यस्तरावर पोहोचण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो. राजकीय नेता असा एका दिवसात वा महिन्यात तयार होत नाही.
धनंजय मुंडे यांनीही असा फारच मोठा संघर्ष गेली दहा वर्षे केला आहे. ज्या काकांच्या छायेत ते वाढले त्यांची साथ सोडून, काकांच्या थेट शत्रुपक्षाशी हातमिळवणी करणे, हे त्यांच्यासाठी नक्कीच मोठ्या धाडसाचे होते. वेदनादायीही होते. ते करून धनंजय शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय बळ घेऊन पुढे निघाले. त्याआधी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कारकिर्दीला सुरवात केली तेव्हा राज्यात भाजपा विरोधी पक्षातच होता. महाराष्ट्रात नितीन गडकरी प्रांताध्यक्ष होते आणि काका गोपीनाथ मुंडे भाजपाचे विधानसभेतील नेते होते. भाजपा परिवारात मुंडेंचा हा पुतण्या थेट त्यांच्यासारख्या शैलीत भाषणे करतो हे प्रसिद्ध झाले होते. परळी विधानसभा मतदारसंघात काकांचे काम पुतण्याच सांभाळत होता. पण जे अन्य काही राजकीय कुटुंबात घडले तेच बीडमधील मुंडे कुटुंबात घडले. राजकीय वारस कोण या प्रश्नावर गोपीनाथरावांशी धनंजय व त्यांचे वडील पंडितराव यांचे मतभेद झाले. २००९मध्ये गोपीनाथ मुंडे खासदार झाले व दिल्लीत संसदेतील विरोधी पक्ष भाजपाचे उपनेतेही बनले. सुषमा स्वराज्य यांच्या बरोबरीने मुंडे काम करत होते. पण इकडे परळीमध्ये मात्र त्यांची कन्या पंकजा आमदार बनली. जी संधी धनंजयला मिळेल असे सर्वांना वाटत होते, ती संधी मुलीलाच मिळाली. तिथे नाराजीची बीजे पेरली गेली. धनंजय मुंडेंना भाजपाने विधान परिषदेचे सदस्यत्व दिले खरे, पण ते त्यांना फारसे रुचले नाही. मुंडेंच्या हयातीतच धनंजय अजित पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांना जाऊन मिळाले.
तो गोपीनाथ मुंडेंसाठी मोठा धक्का होता. “पवारांनी माझे घर फोडले”, असे ते म्हणत. त्यांच्या मनात शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांबाबत आकस राहिला असावा. गोपीनाथरावांच्या अकाली निधनाने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. त्यात हाही एक. परळीची आमदरकी धनंजय मुंडेंचे स्वप्न असणे सहाजिकच होते. पण २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा वारू चांगलाच उधळला होता. त्यात परळीमध्ये गोपीनाथरावांच्या निधनाच्या सहानुभूतीची लाटही पंकजा यांच्या बाजूने होती. धनंजय हरले. पंकजा आमदार व पुढे मंत्री झाल्या. पण २०१९ला धनंजय यांनी पुन्हा संघर्ष केला आणि ते ताईला हरवून परळीचे आमदार तर बनलेच पण मंत्रीही झाले. त्या सत्तेला वर्ष होत असतानाच धनंजय यांच्यामागे एक नवे शुक्लकाष्ट लागले आहे. खरेतर ते आपल्यासाठी, जनतेसाठी, नवे म्हणायचे. कारण त्याची माहिती आता आपल्याला झाली.
त्यांचे हे प्रकरण तरूणपणातीलच होते! “२००३पासून आपण एका महिलेच्या संबंधात होतो” असे स्वतः धनंजय मुंडे यांनीच थेट समाज माध्यमांमधून मान्य करून टाकले आहे. धनंजय यांचा खुलासा अनकांना धक्कादायकही वाटेल. पण कदाचित त्यांच्या बीडमधील मतदारांना, “आपला नेता कसा जिगरबाज आहे, त्याने प्रकरण तर केलेच, पण ते उघड सांगूनही टाकले,” असे अभिमानाचेही वाटू शकते!! असा काहीतरी राजकीय गणिती हिशेब करूनच धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधांची चर्चा केली असावी. “त्या महिलेपासून आपल्याला दोन मुले असून, त्यांना आपण आर्थिक स्थैर्य तर दिलेचे पण नाव देऊन सामाजिक स्थैर्यही दिले आहे,” असेही ते सांगतात. मात्र त्या महिलेची बहिण, जी एक नव्या उमेदीची गायिका आहे, तिने आपले लैंगिक शोषण झाले व बलात्कारही झाला असे आरोप केल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. तिने ओशिवरा पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी एक महिला अधिकाऱ्यांची नेमणूक प्राथमिक तपासासाठी केली आहे. पण या प्रकरणात प्रथम माहिती अहवाल – एफआयआर – दाखल करून घेतलेला नाही. दोन्ही बाजूंची निवेदने घेतल्यानंतर पोलीस योग्य कृती करतील, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
धनंजय मुंडेनी संबंधितांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर, माहिती प्रसारित करण्यास प्रतिबंधात्मक आदेश मुंबई उच्च न्यायालयातून मिळवला आहे, असे ते सांगतात. त्यामुळेच हे प्रकऱण न्यायप्रविष्ट आहे, सबब तिथे निकाल लागल्यानंतरच पक्ष कारवाईचा वा पुढच्या गोष्टींचा विचार करू शकतो, असे राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी सांगून टाकले आहे. थोडक्यात या टप्प्यावर मुंडेंच्या विरोधात पक्ष कृती करणार नाही. पक्ष त्यांच्या पाठीशी ठाम आहे, हेही योग्यच आहे. कारण धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या अशा वंजारा समाजाचे नेते आहेत. ते इतर मागास वर्गीयांच्या चळवळीतही सक्रीय आहेत. त्यांच्यामागे काही प्रमाणात ऊसतोडणी मजुरांचीही शक्ती आहे. एकंदरीतच राजकारणात आवश्यक असणारा मोठ्या समाजाचा पाठिंबा मुंडेंना आहे. त्यामुळेच पक्ष सध्यातरी त्यांच्या विरोधात कृती करताना दिसत नाही. पण मुंडेंनी समाज माध्यमांतून जे कबुलीजबाब दिले आहेत ते त्यांच्यावर व पक्षावर निराळी संक्रांत आणू शकतात, हेही खरे आहे.
त्याची सुरुवात लगेचच झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि नंतर भाजपा नेते चंद्रकातं पाटील आणि देवेन्द्र फडणवीस यांनीही त्या मागणीला बळ दिले. भाजपा मुंडेंच्या राजीमान्याच्या मागणीसाठी आंदोलनातही उतरेल असे प्रांताध्यक्षांनी जाहीर केले. ही राजकीय तापाची एक बाजू. पण त्याहीपेक्षा कायदेशीर आव्हाने अधिक कठीण होऊ शकतात. आमदार होताना सर्वांनाच काही प्रतिज्ञापत्रे भरून द्यावी लागतात. त्यात पत्नी व मुलांच्या संपत्तीचीही माहिती द्यायची असते. मुंडेंनी ती अर्थातच भरून दिलेलीच आहे. पण जर त्यांना जाहीर केल्या व्यतिरिक्त अन्य पत्नी व मुले असतील तर, त्यांची संपत्ती मुंडेंनी २०१४ व २०१९च्या निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रात दिली आहे का? नसेल दिली तर माहिती लपवल्याचा गुन्हा होतो का? आणि तसे असेल तर त्यांची आमदारकी धोक्यात येते का? असे कायदेशीर मुद्दे यातून उपस्थित होणार आहेत.