अयोध्या येथील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामाची नूतन बालमूर्ती स्थापित करून तिची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी होत असल्याचा क्षण मोठ्या एलईडी स्क्रीनवर अनुभवत या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि श्री रामांजनेय देवस्थान (मद्रासी राम मंदिर) यांच्या सहयोगाने आर्च एंटरप्रायझेसच्या ‘प्रभु आले मंदिरी..’ या विशेष स्वरसोहळ्याचे आय़ोजन आमदार पराग अळवणी यांनी केले आहे. हा सोहळा सकाळी ९ वाजता मुंबईतल्या श्री रामांजनेय देवस्थान, सुभाष रोड, विलेपार्ले पूर्व येथील लक्ष्मी नारायण हिरवळीवर होणार आहे.
काव्या खेडेकर आणि अमृती धुमे यांच्या श्रीरामगीतांनी या सोहळ्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर भारतरत्न स्व. पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) यांची विशेष स्वर प्रस्तुती, श्रीरामचंद्रांच्या अयोध्येहून वनवासासाठी प्रयाण ते रावणवध करून अयोध्याला पुनःर्गमन ह्यावर आधारित गीत रामायणातील लोकप्रिय गीतांच्या साथीने नृत्याविष्कार कथ्थक गुरु पूजा पंत आणि त्यांच्या सहनृत्यांगना हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर यावेळी अर्चना गोरे, मंदार आपटे यांचे गायनदेखील होईल. या स्वरसोहळ्याची संकल्पना विनीत गोरे यांची असून निरुपण डॉ. समिरा गुजर-जोशी करतील. अधिकाधिक नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अळवणी यांनी केले आहे.