Homeचिट चॅटभारताचा विक्टरी पंच...

भारताचा विक्टरी पंच जगाला दिसू दे!

ऑलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे   आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते सिद्ध झाले आहे असे सांगत भारताचा विक्टरी पंच जगाला दाखवण्याची  ही सर्वोत्तम संधी असल्याचे टोक्योमध्ये वार्तांकनासाठी गेलेले क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण म्हणाले . 

टोक्यो ऑलिम्पिकचे बिगूल वाजले आहे. आज होणाऱ्या उद्घाटनापासून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होत आहे. यानिमित्ताने पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुंपुढील आव्हाने आणि संधी’ या वेबिनारचे आयोजन केले होते. टोक्योमध्ये वार्तांकनासाठी गेलेले  क्रीडा  पत्रकार संदीप चव्हाण, न्यूज डंका पोर्टलचे सहायक संपादक महेश विचारे आणि मुक्त पत्रकार शैलेश पाटील यांनी वेबिनारमध्ये सध्याची कोरोना परिस्थिती आणि भारतीय क्रीडापटूंना पदक जिंकण्याची असलेली संधी आदी विषयावर भाष्य केले.

 टोक्योमध्ये खेळाडूंच्या आरोग्याची अतिशय योग्य काळजी घेतली जात आहे. यासाठी खेळाडूंचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे. कोरोना काळात एकत्र येत एकमेकांना धीर देण्याची शिकवणूक खेळाडूंनी जोपासली आहे असे तिथल्या प्रत्यक्ष स्थितीविषयी संदीप चव्हाण यांनी सांगितले. अतिशय आव्हानात्मक काळात स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीकडे पूर्वीच्या निकषांप्रमाणे पाहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत होत असलेले हे ऑलिम्पिक मानवी जिद्दीचा विजय आहे. पदक कोणाच्याही नावे असले तरी कोरोना काळात सरकारने खेळाडूंना दिलेला पाठिंबा, त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी केलेल्या उपाययोजना याचे प्रतिबिंब नक्कीच दिसून येईल, असा आशावादही चव्हाण यांनी व्यक्त केला.

भारतीय खेळाडूंना सरकारी पातळीवर आर्थिक सहाय्य, भारतीय क्रीडा प्राधीकरण (SAI), बेंगळुरु येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधांनीयुक्त स्पोर्ट अकादमी जिथे खेळाडूंना  चांगला सराव करता आला. त्याचे परिणाम या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच दिसून येतील, असे मुक्त पत्रकार शैलेश पाटील म्हणाले. कोरोना काळातही खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येऊ नये, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले. खेळाडूंच्या लसीकरणासाठी सरकारने पुढाकार घेतला, याचा नक्कीच खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी उपयोग झाला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी साधलेला संवाद आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी विमानतळावर येऊन क्रीडापटूंना दिलेल्या शुभेच्छा या खेळाडूंच्या मानसिकतेसाठी फार महत्त्वाच्या होत्या असेही त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा वाढलेला टक्का ही महाराष्ट्रीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे न्यूज डंका पोर्टलचे सहाय्यक संपादक महेश विचारे म्हणाले. अतिशय बिकट परिस्थितीतून ऑलिम्पिकपर्यंत भरारी घेतलेला अमरावतीचा प्रवीण जाधव (तिरंदाजी) आणि बीडचा अविनाश साबळे (स्टीपल चेस) यांच्या कामगिरीवर जगाचे लक्ष असणार आहे. तसेच राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत (नेमबाजी), विष्णू सर्वानन (सेलिंग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) या महाराष्ट्रीय खेळाडूंकडूनही पदकाची अपेक्षा आहेत आणि ते तो सार्थ ठरवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्र सूचना कार्यालय, मुंबई येथील सोनल तुपे यांनी वेबिनारच्या संवादकची भूमिका बजावली. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांची निर्मिती असलेल्या ऑलिम्पिक स्फूर्तीगीताने या वेबिनारची सांगता झाली. 

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content