एनटीपीसी (NTPC) म्हणजेच राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ या भारताच्या सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपनीने, फोर्ब्सच्या 2023 च्या ‘द ग्लोबल 2000” यादीमध्ये 52 क्रमांकांनी झेप घेत 433 वे स्थान प्राप्त केले आहे. 2022 मधल्या 485 व्या क्रमांकावरून केवळ एका वर्षात 52 क्रमांकांनी घेतलेली झेप, एनटीपीसी ही जागतिक बाजारपेठेत एक मजबूत शक्ती म्हणून उदयाला आल्याचे निदर्शक आहे. कंपनीचा स्थिर विस्तार, भक्कम आर्थिक स्थिती आणि उत्कृष्टतेसाठी सातत्यपूर्ण वचनबद्धता याचा हा दाखला आहे.

“द ग्लोबल 2000” यादी, विक्री, नफा, मालमत्ता आणि बाजार मूल्य या चार प्रमुख निकषांच्या आधारे जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची क्रमवारी ठरवते. भारतीय कंपन्यांचा विचार करता, एनटीपीसी कंपनी, 2023 च्या यादीत सर्वात मोठ्या भारतीय कंपन्यांच्या श्रेणीत, एक स्थान पुढे जात 10 व्या क्रमांकावर आहे. ही क्रमवारी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून एनटीपीसी चे स्थान अधिक मजबूत करते.

