महाविकास आघाडी सरकारमधले उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला असतानाच आज ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते वरूण सरदेसाई आणि आदेश बांदेकर यांच्याही चौकशीची घोषणा झाल्याने ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे.
कालच विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी सुभाष देसाई यांच्यावर तीन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी देसाई तसेच त्यांचे चिरंजीव भूषण देसाई यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती, जी सरकारने मान्य केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली.

आज नागपूरमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतानाच विधानसभेत भाजपाचे योगेश सागर यांनी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे वरूण सरदेसाई यांच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली. वरूण सरदेसाई अध्यक्ष असलेल्या हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड, या संस्थेच्या माध्यमातून गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतल्या अनेक विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांना फसवण्याचा आरोप त्यांनी केला. वरूण सरदेसाई हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. हिंदुस्तान स्काऊट्स अँड गाईड नावाच्या एका संस्थेने आपली संस्था सरकारमान्य असून असल्याचे भासवून शेतकऱ्यांच्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे आमीष दाखवले. आमच्या संस्थेचे प्रशिक्षण घेतले की आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शाळांमध्ये स्काऊट, गाईडचे ट्रेनर म्हणून नोकरी देऊ, अशी हमी त्यांनी दिली. या संस्थेचे सचिव आहेत रुपेश कदम आणि खजिनदार आहेत पंकज चौरागडे. या आमिषाला बळी पडून शेतकऱ्यांच्या मुलांनी आपापल्या जमिनी विकून दहा-दहा लाख रुपये या संस्थेला दिले, असे सागर म्हणाले.
उमेश काकडे, हेमंत भाकरे, योगेश धानोरकर अशा काही फसलेल्या मुलांची नावेही त्यांनी सांगितली. या संस्थेने गोंदियामध्ये एक आभासी शाळा निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून प्रशिक्षणाची व्यवस्था करत तिथले अपॉइंटमेंट लेटरपण त्यांना दिले. ही मुले जेव्हा तिकडे नोकरी मागायला गेली त्यावेळेला त्या शाळेतल्या व्यवस्थापनाने त्यांना हाकलून लावले. तेव्हा या मुलांना आपण फसलो आहोत याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी आपण दिलेले पैसे परत मिळावे म्हणून पंकज चौरागडे यांच्यामागे तगादा लावला. तेव्हा त्यांनी या मुलांना सांगितले की, हे पैसे आम्ही वरूण सरदेसाईना दिले आहेत. ते जेव्हा परत करतील तेव्हा ते मी परत करीन. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर ही मुले तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना या विषयावर भेटली. भेटली की नाही भेटली हे त्यांनाच माहित. पण माझ्याकडे एक पेनड्राईव्ह आहे ज्यामध्ये या मुलांना असा दम देण्यात आला आहे की, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांना भेटलात ना… आता काय करायचे ते करा. तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर अशा या उच्चपदस्थ संरक्षित आरोपींची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी योगेश सागर यांनी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली.

सिद्धिविनायकही चौकशीच्या फेऱ्यात
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनीही एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या घोटाळ्याचा विषय उपस्थित केला. या न्यासाने कोरोनाच्या काळात सरकारच्या सूचना असताना शिवभोजनची व्यवस्था न करता मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटी रुपये दिले. यासाठी तेथील विस्वस्तांपैकी कोणालाही विश्वासात घेण्यात आले नाही. न्यायालयातही तसे या विश्वस्तांनी एका प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. याच कोरोना काळात एका कोड सिस्टीमसाठी संस्थेने कोणतीही निविदा न मागवता साडेतीन कोटी रुपयांची सिस्टीम खरेदी केली. या सिस्टीमची बाजारात किंमत साधारणतः 40 ते 50 लाख रुपये आहे, असे सरवणकर यांनी सांगितले.
या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे. 18 महिन्यांत जर हे काम पूर्ण झाले नाही तर दरदिवशी दहा हजार रूपये याप्रमाणे दंड वसूल केला जाईल अशी अट संस्थानाने सदरच्या निविदेत टाकली होती. या संस्थानाने आतापर्यंत याबाबत किती पैसे ठेकेदाराकडून वसूल केले हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. कोरोनाच्या काळात लाडूचा प्रसाद बनवण्यासाठी सिद्धिविनायक संस्थानाने 16840 किलोलीटर तूप उत्तर प्रदेशातून मागवले. कोरोनामध्ये भाविकांची संख्या कमी असताना इतक्या तुपाची गरज नव्हती. तरी हे तूप मागवण्यात आले. त्यानंतर न्यासातल्याच काही विश्वस्तांच्या जवळच्या लोकांनी उरलेल्या तुपाची विक्री केली. असंख्य तुपाची नासाडी झाली. या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी सरवणकर यांनी केली.
याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्याच्या आत या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे जाहीर केले. त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संस्थानाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याविरोधात चौकशी करण्याच्या मागणीला अधिक बळ मिळाले आहे.

