आयआयएम मुंबई आणि गायक कैलाश खेर यांची संस्था ‘कला’ यांचा ‘परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये सर्जनशील नेतृत्त्व, या विषयामध्ये उद्योग व्यवसायाप्रमाणे व्यवस्थापनातला पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी काल मुंबईत करार करण्यात आला. भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई (आयआयएम मुंबई) यांनी ‘कला’, या सर्जनशील शिक्षणात अग्रगण्य असणाऱ्या संस्थेबरोबर भागीदारी जाहीर केली. या भागीदारीतून उद्योग-व्यवसाय व्यवस्थापनाच्या सर्जनशील क्षेत्रामध्ये एक वर्ष नेतृत्त्व करता यावे यासाठी सादरीकरण केल्या जाणाऱ्या कलेला व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी शिक्षण देणारा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
हा कार्यक्रम जून 2026पासून मे 2027पर्यंत राबविला जाईल. हा अभ्यासक्रम ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ क्षेत्रातील आघाडीचे विद्यार्थी, सर्जनशील उद्योजक आणि दूरदर्शी कलाकार यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना कलात्मक नवोन्मेष आणि व्यवसाय नेतृत्त्व यांच्यात समन्वय कसा साधायचा याचे ज्ञान घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी ठरणार आहे. याप्रसंगी बोलताना भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी म्हणाले की, कला, या संस्थेसोबत ची आमची भागीदारी आयआयएम मुंबईच्या सहकार्याने नवोन्मेषी आणि परिवर्तनशील नेते कला क्षेत्रामध्येही घडविण्याच्या ध्येयावर आधारित आहे. उद्योजक व्यवस्थापनातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सर्जनशील नेतृत्त्व वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कलात्मकता आणि धोरणात्मक दृष्टीकोनाचा महत्त्वपूर्ण संगम असेल ज्याची आज जगाला गरज आहे.
‘कला’चे संस्थापक, पद्मश्री कैलाश खेर म्हणाले की, परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजे कलाकार केवळ रंगमंचावर आपली कला कशी सादर करतो हे पाहण्याबरोबरच तो आपल्या समाजात आणि कार्यस्थळांवर कसे नेतृत्त्व करतो हे पाहिले पाहिजे. हा सहयोग सर्जनशील नेतृत्त्व व्यवसायशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. उद्योजक व्यवस्थापनातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमात वैयक्तिक ब्रँडिंग, कलात्मक पाया, प्रकल्प कार्यान्वयन, आर्थिक साक्षरता, विपणन, नेतृत्त्व आणि उद्योजकता यांचा अद्वितीय संगम आहे. या अभ्यासक्रमात कठोर सर्जनशील आणि धोरणात्मक विचारांना चालना दिली जाईल. सहभागी विद्यार्थ्यांना नाट्य, संगीत, नृत्य आणि योग यांचा व्यवस्थापनाच्या चौकटींसोबत अनुभव देण्यात येईल. त्यामुळे ते भावनिक बुद्धिमत्ता, अनुकूलता आणि लवचिकतेसह गुंतागुंतीच्या वास्तव जगातील आव्हानांचा सामना करू शकतील.
हा सहयोग आयआयएम, मुंबईच्या आंतरशाखीय नेतृत्त्व शिक्षणातील वचनबद्धतेला अधोरेखित करतो. यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र पारंपरिक व्यवसाय व्यवस्थापन कार्यक्रमांपलीकडे विस्तारून कलात्मक नेतृत्त्व विकासाचा समावेश करेल. कलासोबतच्या या भागीदारीमुळे आयआयएम, मुंबई पदवीधरांना सांस्कृतिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वंकष नेते म्हणून उदयास येण्यासाठी सक्षम करते. जून 2026च्या गटासाठी प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होईल. पात्रतानिकष, अभ्यासक्रम आणि अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखांबाबत सविस्तर माहितीसाठी iimmumbai.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आयआयएम मुंबईच्या कार्यकारी शिक्षण कार्यालयाशी संपर्क साधावा.