Friday, March 14, 2025
Homeडेली पल्सआता कोस्टल रोडवरून...

आता कोस्टल रोडवरून वांद्र्याला जा विनासायास!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, रविवारी मुंबईतल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण करण्‍यात आले. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर (कोस्टल रोड) ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पणदेखील यावेळी करण्‍यात आले. उद्यापासून मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईचे पालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हे सुशोभिकरण टाटा सन्स लि. ॲण्ड अफेलेटसकडून करण्यात येत आहे.

मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताकदिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्यापासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्हकडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश आहे. आता केवळ एक आतंरमार्गिकेची जोडणी व्‍हायची आहे. फेब्रुवारीअखेरीस ही आंतरमार्गिकादेखील नागरी सेवेत रूजू होईल. मुंबई महापालिकेने १४ हजार कोटी रुपये खर्च करून हा किनारी रस्ता तयार केला आहे, असे मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पॉंईंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्‍तर वाहिनी पुलाच्‍या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्‍या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी मरीन ड्राईव्ह दरम्‍यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटांत होणार आहे.

१२ मार्च ते ३१ डिसेंबरपर्यंत ५० लाख वाहनांनी केली ये-जा

मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून १२ मार्च ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो.

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content