Homeमुंबई स्पेशलआता मुंबईत क्लिन...

आता मुंबईत क्लिन अप मार्शल करणार डिजिटल वसुली

आता डिजिटल पद्धतीने मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई आता तंत्रज्ञानाच्या आधारावर डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. त्याचा पथदर्शी प्रकल्प मुंबई महापालिकेच्या ‘ए’ विभागात नुकताच सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रशिक्षित क्लिन अप मार्शल कारवाई करताना आकारलेल्या दंडाची पावती हाताने न लिहिता मोबाईल ऍपद्वारे छापील पावती देणार आहेत. एवढेच नव्हे तर, ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याचा पर्यायदेखील नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत अधिकाधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घ्यावेत, अधिकाधिक पारदर्शक यंत्रणा राबवावी, असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार माहिती तंत्रज्ञानावर आधारित दंडात्मक आकारणीची सुरूवात क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पाला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर संपूर्ण मुंबईत या तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

डिजिटल

स्वच्छताविषयक उल्लंघन केल्याबद्दल होणाऱ्या दंडात्मक वसुलीसाठी डिजिटल व ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही करण्याचे मोबाईल ऍप महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नियुक्त सर्व क्लीन अप मार्शल संस्थांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० याप्रमाणे संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ७०० क्लीन अप मार्शल कार्यरत आहेत. या सर्वांचा प्रशिक्षणात समावेश होता. प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल कारवाई सुरु केल्यानंतर, त्यातून येणाऱ्या अनुभवांना लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबईत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले.

क्लीन अप मार्शलकडे असलेल्या मोबाईलमध्ये पालिकेने तयार केलेले क्लीन अप मार्शल सिस्टीम ऍप असेल. यामध्ये स्वच्छतेचे नियम व नियम मोडल्याबद्दल आकारावयाची निश्चित रक्कम आधीपासूनच समाविष्ट असेल. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना क्लीन अप मार्शलकडून पूर्वी हाताने लिहिलेली पावती दिली जात असे. त्यातून नागरिक व क्लीन अप मार्शल यांच्यामध्ये प्रसंगी वाद होत. या प्रकारांना आता आळा बसणार आहे. कारण, ही पावती सिस्टीम जनरेटेड म्हणजे मोबाईल ऍपमध्येच डिजिटली तयार होऊन दिली जाणार आहे. त्यासाठी, क्लिन अप मार्शलकडे मोबाईल ब्लू टूथवर चालणारा छोटा प्रिंटरदेखील देण्यात आला आहे. आकारलेल्या दंडाकरिता या प्रिंटरद्वारे पावती छापून दिली जाणार आहे. छापील पावतीचा गैरवापर टाळण्यासाठी ऍपशी संलग्न अशा प्रिंटरच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पावतीचाच वापर केला जाणार आहे.

नागरिकांना मिळालेल्या पावतीवर महानगरपालिकेचे बोधचिन्ह तसेच पावती क्रमांक असेल. महानगरपालिकेच्या विभागाचे नाव, दिनांक, वेळ तसेच कारवाई केलेल्या जागेचा अक्षांश, रेखांशदेखील असेल. म्हणजेच, पावतीमध्ये गैरव्यवहाराला कोणताही वाव राहणार नाही. परिणामी, नागरिक आणि मार्शल यांच्यातील वादाचे प्रसंग टळतील. तसेच, व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता राहील. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या व्यक्तीला दंडाच्या रकमेचा ऑनलाईन भरणा करावयाचा असेल तर त्यांना क्यूआर कोड स्कॅन करुन अथवा यूपीआयद्वारे रक्कम ऑनलाईन भरता येईल. त्याचप्रमाणे, मोबाईल क्रमांक पुरवलेल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर लघुसंदेश (एसएमएस)द्वारेदेखील भरणा करण्यासाठी लिंक दिली जाईल. एसएमएसद्वारे दिलेली लिंक उघडून दंडाची रक्कम भरता येईल.

ज्यांना रोख रक्कम भरावयाची आहे, ते रोख रक्कम देऊ शकतील. या दोन्ही पद्धतींची डिजिटल पावतीच्या माध्यमातून नोंद राहणार आहे. दंडासाठी माहिती भरताना क्लीन अप मार्शल व ज्यांना दंड आकारला, ते नागरिक या दोहोंची नोंद होणार आहे. एकूणच या मोबाईल ऍपद्वारे दंड आकारणीचा सगळा हिशेब राखला जाईल व या कामामध्ये संपूर्ण पारदर्शकता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही कार्यवाही डिजिटल झाल्यामुळे पालिकेला कोणत्या दिवशी किती रक्कम दंड आकारणी झाली, कोणत्या जागेवर, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारासाठी दंड आकारणी झाली, याचे सर्व अचूक तपशील कळू शकतील. 

ए विभागात प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणीचे अनुभव लक्षात घेवून, सी विभागातदेखील हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यापाठोपाठ पालिकेच्या सर्व विभागांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरु केली जाईल. सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे किमान १०० रूपये तर कमाल १ हजार रूपये इतका दंड आकारण्याचे अधिकार क्लिन अप मार्शल यांना असणार आहेत. नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content