महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी शाळा चालूच ठेवून त्यांच्या वैद्यकीय सहली काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्दीमाध्यमांना ही माहिती दिली. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाने जोरदार उसळी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातल्या कोरोनाचे संक्रमण जवळजवळ दुपट्टीने वाढले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सबरोबर सविस्तर बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने नुकतेच १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. ही मोहीम राबविताना शाळा बंद ठेवायच्या नाहीत. शाळेत जाऊनही त्यांचे लसीकरण करायचे नाही. त्यापेक्षा त्यांना वाहनातून लसीकरण केंद्रांवर न्यायचे आणि त्यांचे लसीकरण करायचे, अशा धोरणाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात पहिल्या डोससाठी जवळजवळ ९० टक्के लसीकरण झाले आहे. दुसऱ्या डोससाठी साधारण ५७-५८ टक्के लसीकरण झाले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सर्वेक्षणात फार कमी लसीकरण झाले आहे अशा जिल्ह्यांमध्ये लसीकरण बंधनकारक करण्याकरीता तेथील प्रशासनाची येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असेही टोपे म्हणाले.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणते नवे निर्बंध लावायचे याचा निर्णय मुख्यमंत्री उद्यापर्यंत घेतील. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी येत्या १० ते १५ दिवसांत एसजीटीएफ किटचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने तशी सूचना केली आहे. या किटच्या वापराने ओमिक्रॉनचे रूग्ण ओळखण्यास मदत होईल. उपचारासाठी नव्याने निघालेल्या गोळीचा वापर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
उद्याच्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जनतेने गर्दी निर्माण होईल, असे कोणतेही कार्यक्रम हाती घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

