जागतिक पातळीची अंतराळ संशोधन संस्था असेल तर तेथे अवकाश आणि तेथील स्वारी याबद्दलचे संशोधन होत असणारच.. आणि त्यासाठी हजारो संशोधक तेथे विविध विभागात काम करीत असतील हे आपण समजू शकतो. पण येथे केवळ संशोधकच नव्हे तर कलाकारही काम करतात, अशी माहिती मिळते. ‘नासा’, या जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्थेबद्दल मी बोलत आहे.
‘नासा’ ही अमेरिकेची सुप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था आहे. अमेरिकेच्या अवकाशातील सर्व मोहिमांची तयारी आणि संचालन येथून केले जाते. “आमच्या येथे केवळ क्षेपणास्त्र संशोधनाचं काम करतात असे

नाही तर इतर अनेक शाखांमधील उच्च श्रेणीचे निर्मितीक्षम सहकारीदेखील येथे काम करतात आणि आमची संस्था त्यांच्या कामापासून नेहमी प्रेरणा घेत असते. ‘नासा’ला भेट देणारी तरुणाई त्यांच्या या कामाने चकित होते. असे कलाकार आज नव्हे तर गेली अनेक दशके येथे काम करीत आहेत.” असे ‘नासा’च्या ग्लेन संस्थेचे संवाद संचालक क्रिस्टन पार्कर म्हणाले.
आज ग्लेन संशोधन संस्था म्हणून प्रसिद्ध यंत्रणेत जेम्स “जिम” मोदारेल्ली यांनी १९४९ साली कलाक्षेत्रातील आपल्या पदवीनंतर कलाकार म्हणून प्रवेश केला. काही काळानंतर ही संस्था जेव्हा मुख्य ‘नासा’ या अंतराळ संस्थेत सामील झाली तेव्हा ‘नासा’ संस्थेसाठी एक ओळखचिन्ह तयार करण्यासाठी संस्थेतील सर्व

कलाकारांना आवाहन केले गेले होते. मोदारेल्ली हे त्यावेळी व्यवस्थापन सेवांचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. ओळखचिन्हासाठी त्यांनी प्रस्तुत केलेले चित्र विजेता म्हणून घोषित केले गेले. हे ओळखचिन्ह अ ९५९मध्ये अधिकृतपणे मान्य केली गेले.
यापूर्वी मोदारेल्ली जेव्हा एका संशोधन शाळेत गेले होते त्यावेळी त्यांनी ध्वनीच्या गतीहून अधिक वेग असणाऱ्या एका विमानाचे मॉडेल पाहिले होते. त्यामधील काही अंश आज ‘नासा’च्या ओळखचिन्हात दिसतो. ‘नासा’च्या सुप्रसिद्ध केनेडी अवकाश केंद्राच्या ५२५ फूट उंच वाहनजोडणी इमारतीवर हे ओळखचिन्ह आज दिमाखात अमेरिकेच्या अवकाश यात्रांची आणि संशोधनाची पावती देत आहे. अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर जेम्स “जिम” मोदारेल्ली १९७९मध्ये निवृत्त झाले आणि २७ सप्टेंबर २००२ रोजी त्यांचे निधन झाले. जेम्स मोदारेल्ली यांची जगप्रसिद्ध निर्मिती असलेल्या या ओळखचिन्हाला येत्या १५ जुलैला ६५ वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने ‘नासा’ संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे..