कालच यंदाचा २५ जून गेला आणि आणीबाणी आठवली. १९७५ साली २५ जूनला तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली. वसंतराव त्रिवेदी हे महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. त्यांनी आपल्या परिवाराच्या मदतीने भूमिगत चळवळ राबविण्याचे शिवधनुष्य उचलले. साप्ताहिक आहुतिमधून आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी राबविलेल्या २० कलमी कार्यक्रमाचे गुणगान करायचे आणि दुसऱ्या बाजूला भूमिगत चळवळ राबविताना लोकनायक जयप्रकाश नारायण, मृणाल गोरे, बाळ दंडवते यांची पत्रके छापून, गठ्ठे बनवून, ती पहाटे पहाटे लोकलने मुंबईत कांजूरमार्ग, करी रोड, चिंचपोकळी आदी ठिकाणी फलाटांवर फेकून यायचे. तीच पत्रके संपादक आहुति म्हणून पोस्टाने पुन्हा वसंतरावांच्या घरी येत असत.
ठाण्याचे ज्येष्ठ कामगार नेते मधू जोशी अठरा महिने भूमिगत होते. ते मुक्कामाला वसंत त्रिवेदी यांच्या घरी असायचे. काही वेळा तर अंगात ताप असूनही ते सात अकराचे ट्रेडल मशीन चालवायचे. गुप्त पोलिस वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी वसंत त्रिवेदी परिवाराला सावधगिरीच्या सूचना दिल्या. कोणी आले तर सात अकराच्या छपाई यंत्रावर २० कलमी कार्यक्रमाचे प्रूफ दाखवायचे. एके दिवशी अचानक धाड पडली तेव्हा भूमिगत चळवळीचे पत्रकाचे जुळणी केलेले छपाईचे अख्खे कंपोज केलेले पान मागच्या बाजूला असलेल्या सहा पुरुष खोल विहिरीत टाकून दिले. त्रिवेदी परिवार बालंबाल बचावला. त्यांच्या मुलाची एक ब्रीफकेस झुंझार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या बडोदा डायनामाईट केसमध्ये जप्त करण्यात आली.
आणीबाणी उठली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखालील संपूर्ण क्रांती आंदोलन यशस्वी झाले. मोरारजी देसाई यांची संघटना काँग्रेस, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष आणि भारतीय लोकदल अशा चार पक्षांचा जनता पक्ष तयार करण्यात आला. काँग्रेसच्या तरुणतुर्क चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत, पी. के. अण्णा पाटील यांनीही जनता पक्षात हिरीरीने भाग घेतला. इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. भारतीय लोकदलाच्या ‘नांगरधारी शेतकरी’ या निवडणूक चिन्हावर जनता पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुका लढविल्या. देशभरात जनता पक्षाची बांधणी सुरु झाली.
वसंतराव त्रिवेदी यांची ठाणे जिल्हा जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. साथी दत्ता ताम्हाणे या बुजूर्ग नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित मावळहून आलेले रामचंद्र काशीनाथ उर्फ रामभाऊ म्हाळगी यांच्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ उपलब्ध करून दिला. १९७७ साली जनता पक्षाची लाट आली होती आणि रामभाऊ म्हाळगी ठाणे मतदारसंघातून सहज निवडून आले.
१९७८ साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. चार पक्षांचा जनता पक्ष जरी झाला असला तरी तो एकजिनसी होऊ शकला नाही. परिणामी अंबरनाथ मतदारसंघातून आम्हाला जरी उमेदवारी दिली नाही तरी चालेल पण वसंतराव त्रिवेदी यांना उमेदवारी देऊ नका, अशा प्रकारच्या भूमिका पक्षातील अन्य नेत्यांनी घेतल्या. त्यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या १३ जागा होत्या. वसंतराव त्रिवेदी जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असले तरी ते पत्रकार असल्याने त्यांनी बी. ए. देसाई, प्रभुभाई संघवी या पक्षनिरीक्षकांकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे चित्र उभे केले. मला उमेदवारी दिली नाही तरी मी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी काम करीन, अशी निःसंदिग्ध ग्वाही वसंतराव त्रिवेदी यांनी निरीक्षकांना दिली. या संधीचा लाभ घेत वसंतरावांच्या सहकाऱ्यांनीच वसंतरावांचा पत्ता कापला.
आबासाहेब पटवारी डोंबिवलीचे नगराध्यक्ष आणीबाणीच्या काळात तुरुंगात असल्याने उपनगराध्यक्ष असलेल्या जगन्नाथ पाटील यांना अंबरनाथमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांना निवडून आणण्यासाठी त्रिवेदी यांनी अथक परिश्रम घेतले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली १९७८ साली पुरोगामी लोकशाही दलाचे (पुलोद) सरकार महाराष्ट्रात आले. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात जनता पक्षाचे मंत्री सहभागी झाले होते. जनसंघाचे उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, दिलवरसिंह पाडवी आणि डॉ. प्रमिला टोपले, समाजवादी साथी निहाल अहमद, प्रा. सदानंद वर्दे, जगन्नाथ जाधव, भाई वैद्य आदींचा मंत्रिमंडळात समावेश होता. संघाचे लोक पवारांच्या नावाने कितीही बोटं मोडत असले तरी पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची संघाच्या नेत्यांची १९७८पासूनची परंपरा आहे. हा विनोद नव्हे तर वस्तुस्थिती आहे.
माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री म्हणून भाई वैद्य अंबरनाथ येथे त्रिवेदी यांच्या मनोरमा मुद्रणालयात १४×२२ च्या मोठ्या छपाईयंत्राचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यांनी आपल्या भाषणात वसंतराव त्रिवेदी यांनी भूमिगत चळवळ राबविली नसती तरच मला आश्चर्य वाटले असते, असे सांगितले, तेव्हा उपस्थित विविध पक्षांचे कार्यकर्ते पाहतच राहिले. प्रा. राम कापसे यांनी ठाणे जिल्हा जनता पक्षाच्या एका बैठकीत आहुति साप्ताहिकाला जनता पक्षाचे मुखपत्र करण्याची सूचना केली होती. त्यावर मी पक्षाचा असलो तरी माझे आहुति साप्ताहिक कोणत्याही पक्षाला वाहून घेणार नाही, ते नि:पक्षच राहील, अशी परखड भूमिका वसंतरावांनी मांडली.
१९५५ सालापासून १९९६पर्यंत वसंतराव त्रिवेदी अंबरनाथला वास्तव्यास होते. या कालावधीत त्यांनी इतिहासाची अनेक पाने लिहिली. किंबहुना इतिहासातील अनेक घटनांचे ते एक महत्त्वपूर्ण घटक बनले. स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम केले. नंदुरबार येथे शिरीषकुमार पुष्पेंद्र मेहता आणि बाल सहकाऱ्यांसमवेत ९ सप्टेंबर १९४२ रोजी ब्रिटिशांविरुद्ध मिरवणूक काढली. आणीबाणीच्या काळात भूमिगत चळवळ राबविली. पण केवळ तुरुंगात गेले नसल्याने त्यांना कोणत्याही सरकारी सुविधा मिळाल्या नाहीत. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी त्रिवेदी यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून शासनाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी शिफारस केली होती. परंतु त्याही मिळू शकल्या नाहीत. मागासवर्गीय नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सामाजिक न्याय विभागाच्या पुणे कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार मिळावा म्हणून वसंतराव त्रिवेदी आणि मनोरमा त्रिवेदी यांच्या नावाचे प्रस्ताव सादर करण्यात आले. पण वसंतराव त्रिवेदी यांना हा पुरस्कार मिळू शकला नाही. वसंतरावांच्या देहावसानानंतर मनोरमा त्रिवेदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भूमिगत चळवळ राबविणारे आणि तुरुंगात न गेलेले अनेक आहेत. जे तुरुंगात गेले त्यांना सुविधा मिळाल्या. पण तुरुंगाबाहेर राहून कार्य करणारे मात्र वंचितच राहिले.