Homeएनसर्कलऔषधांच्या गुणवत्तेशी तडजोड...

औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नाही!

कोविड आपत्तीनंतर जगाचे औषधी भांडार ही भारताने निर्माण केलेली ओळख टिकून राहावी यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच, रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील उद्योगांना केले आहे. मात्र, आगामी काळात आपले हे स्थान टिकवण्यासाठी आपल्या औषधांच्या गुणवत्तेबाबत तडजोड करून चालणार नाही. ही गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे आणि त्यासाठी उद्योगांनी एक स्वयं नियामक प्रणाली स्थापन करण्याचा विचार करावा अशी सूचना त्यांनी केली. गुणवत्तेबाबत तडजोड करणाऱ्यांबाबत सरकारचे शून्य सहनशीलता धोरण आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा कंपन्यांविरोधात सरकारने कठोर पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारतीय औषधनिर्माण आघाडी (आयपीए) ने आयोजित केलेल्या जागतिक औषधनिर्माण गुणवत्ता शिखर परिषदेची नुकतीच सांगता झाली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी या समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन केले.

कोविड आपत्तीच्या काळात सरकार आणि औषधनिर्मिती उद्योग या दोघांच्या सामाईक जबाबदारीने आपण या स्थानापर्यंत पोहोचू शकलो. उद्योगांनी आपली जबाबदारी ओळखून पूर्णपणे सरकारच्या मार्गदर्शनानुसार काम केले. आपत्तीच्या त्या काळात कोणीही आपल्या फायद्याचा किंवा आपल्या स्वार्थाचा विचार केला नाही असे सांगत त्यांनी उद्योगांच्या भूमिकेची प्रशंसा केली. उद्योगांच्या सहकार्यामुळेच भारताने 150हून जास्त देशांना कोविड वरील उपचारांसाठी औषधं आणि प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्याची कामगिरी करून दाखवली, असे ते म्हणाले. ही सर्वच औषधे दर्जेदार होती आणि कोणत्याही देशाकडून औषधांच्या दर्जाबाबत तक्रार आली नाही, असे त्यांनी नमूद केले. दर्जेदार औषधांबरोबरच मोठ्या प्रमाणात औषधनिर्मिती करण्याची भारताची क्षमता आहे. त्यामुळे भारत क्वालिटी आणि क्वान्टीटी या दोन्ही बाबतीत पुढे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुणवत्ता टिकवण्यासाठी उद्योगांच्या सहकार्याची आवश्यकता आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दर्जेदार औषधनिर्मिती आणि निर्यातवाढीसाठी आपल्याला परस्परांसोबत विचारविनिमय केला पाहिजे, असे मांडवीय यांनी सांगितले. बदलत्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन औषधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने संशोधनाच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत आणि सर्वांसाठी त्या खुल्या केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. संशोधन आणि नवोन्मेष या दोन्ही क्षेत्रात भारताची आगेकूच सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या शिखर परिषदेची संकल्पना, “रुग्ण केंद्री व्यवस्था: उत्पादन आणि दर्जातील नवा आमूलाग्र बदल” अशी होती. या दोन दिवसीय शिखर परिषदेत, या क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, जागतिक नियामक, गुणवत्ता विषयातील तज्ञ आणि इतर हितसंबंधीय एकत्र आले होते. भारतातील औषधनिर्माण क्षेत्राला आकार देण्यासाठी महत्वाच्या विषयांवर या परिषदेत चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.

आयपीए चे अध्यक्ष आणि टोरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीचे प्रमुख समीर मेहता यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारत सरकारच्या औषधनिर्माण विभागाच्या सचिव एस अपर्णा यांनी उद्घाटन सत्रात मुख्य भाषण केले. पहिल्या दिवशी औषधनिर्माण उद्योगात उत्पादन आणि गुणवत्ता निर्माण करण्याच्या संस्कृतीच्या भविष्यातील महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. जगभरातील नियामक – ज्यात अमेरिकेतील एफडीए, एमएचआरए, ईडीक्यूएम आणि सीडीएससीओ यांनी अलीकडे करण्यात आलेल्या तपासणीची निरीक्षणे तसेच कल  अधोरेखित करणार्‍या नियमनविषयक प्रकरणांवर चर्चा केली. औषधनिर्माण उत्पादनांचा दर्जा उत्तम राहील, हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यावर सविस्तर चर्चा होऊन पहिल्या सत्राची सांगता झाली.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, उद्योग प्रमुखांनी, ह्या क्षेत्रात सुरु असलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. यात, सातत्याने होत असलेले उत्पादन, नियामकांकडून अपेक्षा, औषधनिर्माण क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान, आणि इतर उद्योगांकडून शिकण्यासारख्या गोष्टी अशा विविध विषयांवर चर्चा केली. या दिवशी, औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या जसे की, सिपला, डॉ. रेड्डीज, लुपिन, सन फार्मा आणि झायडस यांच्या कार्यकारी प्रमुखांनी भारतीय औषधनिर्माण क्षेत्राच्या भवितव्याविषयी आपले विचार मांडले.

भारतीय औषधनिर्माण आघाडीचे सरचिटणीस, सुदर्शन जैन, यांनी सांगितले, “भारतीय औषधनिर्माण उद्योग, जगभरातील रुग्णांच्या आरोग्याला आकार देण्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. भारत, दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरातील औषध पुरवठ्यासाठी जगभरात सुप्रसिद्ध आहे. कोविड -19 च्या काळात, आपल्या उद्योगाने जी चिकाटी दाखवली, त्यामुळेच, आज आपला देश जगाचे औषधालय म्हणून ओळखला जातो. दर्जा किंवा गुणवत्ता ही औषधनिर्माण क्षेत्राची मूलभूत आवश्यकता आहे. त्यामुळे, गुणवत्ता व्यवस्था, तंत्रज्ञान आणि कौशल्यनिपुणता यात सातत्याने गुंतवणूक करणे, ही सर्वंकष आरोग्यविषयक परिदृश्यासाठी अत्यंत मूलभूत आवश्यकता असून त्यात आता अभूतपूर्व वाढ होत आहे. भारताला औषधांच्या गुणवत्तेच्या क्षेत्रात एक बेंचमार्क म्हणून जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्यास आयपीए कटिबद्ध आहे” असे त्यांनी सांगितले. 

आयपीए विषयी

इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स- अर्थात भारतीय औषधनिर्माण आघाडी ही संस्था 24 संशोधन-आधारित राष्ट्रीय औषधनिर्माण कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. एकत्रितपणे, IPA कंपन्यांची औषधनिर्माण संशोधन आणि विकासामध्ये 85 टक्क्यांहून अधिक खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आहे. ते देशाच्या 80 टक्क्यांहून अधिक औषधे आणि औषधनिर्माणच्या निर्यातीत योगदान देतात आणि देशांतर्गत बाजारपेठेच्या 60 टक्क्यांहून अधिक सेवा देतात.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content