नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत देशाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना काठमांडू येथील ‘शीतल निवास’ येथे पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच मधेश प्रदेशातील एका तरुण नेत्याने पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली आहे.
बालेन शाह यांच्या ‘राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी’ने (आरएसपी) ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत २७५ पैकी १८२ जागा जिंकून निर्भेळ बहुमत मिळवले. त्यांनी झापा-५ या मतदारसंघातून माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा मोठ्या फरकाने पराभव करत प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला. गेल्या वर्षी नेपाळमध्ये झालेल्या युवक क्रांतीनंतर (जेन-झी प्रोटेस्ट) जनतेने पारंपरिक पक्षांना नाकारून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या आशेने बालेन यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेन शाह यांचे अभिनंदन केले असून भारत आणि नेपाळमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर असलेल्या बालेन शाह यांच्यासमोर आता नेपाळची अर्थव्यवस्था सावरण्याचे आणि सुशासन देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच संबोधनात तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवून विकास करण्याचे संकेत दिले आहेत.

