Homeकल्चर +मराठी रंगभूमीवर 'नथुराम' विरुद्ध 'नथुराम'!

मराठी रंगभूमीवर ‘नथुराम’ विरुद्ध ‘नथुराम’!

नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाबद्दल वेगवेगळी मते असली तरी त्यांच्यावर आधारित नाटक ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या शीर्षकाच्या साधर्म्यावरून मात्र अभिनेते शरद पोंक्षे आणि नाट्यनिर्माते उदय धुरत यांच्यात मात्र जोरदार जुंपणार आहे. नाट्यक्षेत्रातल्या या दोन व्यक्तिमत्वांची याच शीर्षकाच्या साधर्म्याची दोन वेगवेगळी नाटके रंगमंचावर येणार आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमीवर मात्र नथुराम‘ विरुद्ध नथुराम‘, असा प्रयोग दिसणार आहे.

आज धुरत यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षांत घडले नाही, असे कृत्य ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या बहुचर्चित मराठी नाटकाच्या निमित्ताने घडत आहे. शीर्षकासह या नाटकाची संहिताच ढापण्याचा हा प्रकार घृणास्पद व निंदनीय आहे. प्रचंड मेहनत घेऊन, संशोधन करून दिवंगत ज्येष्ठ लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या लिखाणाचे व शीर्षकाचे श्रेय या नाटकाद्वारे अभिनेता म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तीनेच (शरद पोंक्षे) करावे हे मराठी रंगभूमीसाठी शोभनीय नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडला जाईल आणि अनेक प्रतिभावंत नाटककारांचे श्रेय लाटण्याची परंपरा सुरू होईल, अशी भीती उदय धुरत यांनी व्यक्त केली.

यापूर्वी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे माऊली प्रॉडक्शनचे नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. त्याचबरोबर या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत दिसलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडेसे बोलतोय’ हे नाटक घेऊन येत असल्याचे जाहीर केले आहे. नाटकाचे शीर्षक जवळपास सारखे असल्याने त्यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली असून निर्माते उदय धुरत यांनी पोंक्षे यांना ७२ तासांचा कालावधी दिला आहे. जर त्यांनी माघार घेतली नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ साली माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते. शरद पोंक्षे यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका लोकप्रियही ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक खूप चर्चेत राहिले. नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यानंतर २०१६मध्ये निर्माते धुरत यांनी हे नाटक थांबविण्याचा निर्णय घेतला.

नाट्यनिर्माते धुरत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. विवेक आपटे याचे दिग्दर्शन करीत असून, त्याच्या तालमी ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले दिसणार आहे. हे नाटक ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची जाहिरात जुलैमध्ये वर्तमानत्रांत प्रसिद्ध झाली होती. ‘नथुराम’च्या भूमिकेतील कलाकाराचे नाव निश्चित झाल्यानंतर आता नाटकाच्या तालमी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येईल, असे दिग्दर्शक विवेक आपटे यांनी सांगितले.

आमच्या माऊली प्रॉडक्शन्सची जाहिरात पाहून शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाची लेखक-दिग्दर्शकाचे नाव नसलेली जाहिरात १५ ऑगस्टला प्रसिद्ध केली. पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत असून, नाटकाचे ५० प्रयोग होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराला एका ज्येष्ठ नाटककाराच्या संहितेची-शीर्षकाची गरज का भासली? नाटकाच्या संहिता-शीर्षकावरून न्यायालयीन लढाई होईल, असे धुरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संदर्भात धुरत यांच्याकडून पोंक्षे यांना आतापर्यंत तीन नोटिसा पाठविण्यात आल्या असून शेवटच्या नोटीसची मुदत ७२ तासांची आहे. ज्येष्ठ वकील ए. एल. गोरे यावेळी उपस्थित होते.

सौरभ गोखले नवा नथुराम!

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष असेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content