Homeकल्चर +हेचि दान देगा...

हेचि दान देगा देवा…

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तू दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे हे मानवी शरीर.. देवा तू या विश्वातला सर्वात उत्तम एकमेव असा इंजिनीयर आहेस की, ही सुंदर देहरचना तू बनवलीस.. तेही कोणतेही चार्जेस न घेता.

देवा तुझ्याकडे एकच मागणे आहे. जसे तू हे सुंदर अनमोल शरीर आम्हाला दिलेस त्याचा विसर आम्हाला कधीही पडू देऊ नकोस. त्याच सतत चांगल्या रीतीने पोषण होईल, रक्षण होईल, आपल्या जगण्याचा काहीतरी उपयोग होईल, अशी आम्हाला तू बुद्धी दे.

देवा अशी बुद्धी दे की, तिचा सत्कार्य करण्यासाठी वापर होईल. कोणतेही पाप, वाईट कृत्य, वाईट विचार आमच्या मस्तकामध्ये शिरकाव करू शकणार नाही. सतत तुझे स्मरण राहील अशी बुद्धी दे देवा.

असे नेत्र दे, ज्यामुळे तुझ्यासारखी दृष्टी आम्हाला लाभेल. सर्व जग सुंदर दिसेल. दृष्टी साफ, स्वच्छ असेल तर आमचे मनही तसेच सुदृढ, निरोगी, आनंदी राहील.

देवा अशी वाणी दे की, जिच्यातून तुझे गुणगान गायले जाईल. कुणाचंही मन दुखावले जाणार नाही. कुणालाही दुःख होणार नाही. आमचे शब्द ऐकून एखाद्याला धीर मिळेल. मन आनंदी होईल, एखाद्याच्या चेहऱ्यावर आमच्यामुळे हसू फुलेल, अशी मधुर वाणी आम्हाला दे.

देवा तुझ्यासारखे दानशूर हस्त आम्हाला दे, जो सतत दुसऱ्याला देत असतो. कोणतीही अपेक्षा न करता, अशीच वृत्ती, असेच हस्त आम्हाला दे. कोणतेही वाईट कृत्य या हातांकडून घडू नये. देवा, असे दान आम्हाला दे.

हेचि दान देगा देवा… तुझा विसर न व्हावा.

Continue reading

Skip to content