मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक संगीत महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव १४, १५ आणि १६ नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ १४ नोव्हेंबरला सुप्रसिद्ध सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांच्या सरोदवादनाने होईल. त्यांना तबल्याची साथ पं. योगेश सम्सी यांची आहे. १५ नोव्हेंबरला जयपूर घराण्याचे नामवंत गायक पं. रघुनंदन पणशीकर यांचे गायन होईल. त्यांना तबल्यावर भरत कामत आणि हार्मोनियमवर अमेय बिचू साथ करतील. १६ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सवाचा समारोप सुविख्यात गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर आणि हार्मोनियमवर अनंत जोशी साथ देतील.

हे सर्व कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले वातानुकूलीत सभागृहात रोज संध्याकाळी पाच वाजता सुरू होतील. हा संगीत महोत्सव विनाशुल्क असून गानरसिकांना आसनमर्यादेमुळे प्रथम येणाऱ्या प्राधान्य यानुसार प्रवेश मिळेल. तरी रसिकांनी या मैफलींचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


