Homeमुंबई स्पेशलमुंबई अग्निशमन दलास...

मुंबई अग्निशमन दलास मिळणार क्यूआरव्हींचे बळ

मुंबई महानगरातील दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते व गल्ली, जास्त वाहतूककोंडीचे मार्ग अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे शीघ्र प्रतिसाद वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तेथे त्वरित मदत पोहोचविता यावी या हेतूने मुंबई अग्निशमन दलात २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा (Quick Response Vehicle म्हणजेच क्यूआरव्ही) ताफा दाखल झाला आहे. या वाहनांमुळे आपत्कालीन प्रसंगांत संभाव्य हानी रोखून दुर्घटनांवर कमीतकमी वेळेत नियंत्रण ठेवण्यास मुंबई अग्निशमन दलास मदत होणार आहे.

प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अग्निशमन दलाने नुकताच २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा (Quick Response Vehicle) आपल्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पालिकेच्या चार प्रशासकीय विभागांत ही वाहने दाखल झाली आहेत. अग्निशमन दलात एरवी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या वाहनांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या क्यूआरव्ही वाहनांचा आकार लहान आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून मार्ग काढणे शक्य होणार आहे.

मुंबई महानगरात लोकसंख्येच्या तुलनेत जागेची टंचाई असल्याने काही परिसरांत कमी जागेत नागरिक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येतात. आता या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने आपल्या ताफ्यात २२ शीघ्र प्रतिसाद वाहनांचा ताफा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत २४ प्रशासकीय विभाग आहेत. मात्र यातील ‘डी’ आणि ‘ई’ विभाग हे मुख्य अग्निशमन केंद्राजवळ असल्याने हे दोन विभाग वगळून इतर २२ विभागांसाठी ही वाहने सज्ज राहणार आहेत. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ही २२ वाहने अग्निशमन विभागाकडे आली आहेत. लवकरच ही वाहने प्रत्येक विभागासाठी नेमून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. सध्या टागोर नगर (गोदरेज कंपाऊंड, विक्रोळी), पालिकेचे नागरी प्रशिक्षण केंद्र (बोरिवली), लोढा फ्लोरेंजा इमारत (गोरेगाव), लोढा पार्क इमारत (जी दक्षिण) येथे ही वाहने सज्ज आहेत. उर्वरित १८ विभागातही लवकरच ‘क्यूआरव्ही’ पोहोचणार आहेत.

असे आहे ‘क्यूआरव्ही’

सध्या मुंबई अग्निशमन दलाकडे १९ मिनी फायर स्टेशनसाठी १९ ‘क्यूआरव्ही’ आहेत. आता त्यात आणखी २२ वाहनांची भर पडणार आहे. त्यामुळे साहजिकच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होणार आहे. या वाहनांमध्ये ५०० लिटर पाणी, रेस्क्यू टूल्स उपलब्ध आहेत. चालक, सुपरवायझर आणि दोन फायरमन असे चौघे जण या वाहनासोबत घटनास्थळी पोहोचणार आहेत. हे चारही जवान महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथून किंवा शासनमान्य  संस्थांकडून प्रशिक्षण घेतलेले असतील.

ही वाहने अरुंद परिसरांमध्ये सहज पोहोचून नागरिकांची मदत करू शकतील. आपत्कालीन मदतीचा संदेश मिळताच अत्यंत कमी वेळेत ही वाहने घटनास्थळी पोहोचतील, म्हणजे कमीतकमी रिस्पॉन्स टाइम असेल. घटनास्थळी ही वाहने पोहोचल्यानंतर तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन आणखी मदत हवी असल्यास त्याबाबत मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधणार आहेत. तसेच पक्षी अडकणे, वाहनांमधून तेल रस्त्यावर सांडणे, शॉर्ट सर्किट अशा घटनांवरही ‘क्यूआरव्ही’ वाहन आणि त्यांचे पथक नियंत्रण मिळविणार आहेत. 

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content